केळशी ग्रामपंचायत ११ सप्टेंबर रोजी करणार पाहणी; संबंधितांना नोटिस जारी.
मडगाव : माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरा यांनी केळशी येथे एक घर व नऊ लाकडी कॉटेज उभारणीसाठी परवानगी मागितली आहे. या प्रकल्पाला गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथरिटीकडून (सीआरझेड) मंजुरी मिळालेली असली तरी पंचायतीची परवानगी अद्याप बाकी आहे. या अनुषंगाने केळशी पंचायतीकडून ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष जागेची पाहणी होणार आहे.
नेहरा यांनी ११ जून २०२५ रोजी पंचायतीकडे अर्ज सादर केला होता. त्यात वास्तव्यासाठी एक घर व नऊ लाकडी कॉटेज उभारण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या प्रस्तावाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध दर्शवला होता. कॉटेज उभारणीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण होईल, असा त्यांचा आक्षेप होता.
या आधी नेहरा याच्या केळशी येथील जागेवरील तोडण्यात आलेल्या झाडांमुळे व परवानगीविना रस्त्याची निर्मिती करण्यात आल्याने गोंधळ निर्माण झालेला होता. त्यानंतर ती जागा पूर्ववत करण्यात आलेली होती. आता पुन्हा एकदा नेहरा यांच्यातर्फे हिमांशू जैन यांनी पंचायतीकडून परवानगी मिळावी यासाठी अर्ज केलेला आहे.
दरम्यान, नेहरा याच्या तात्पुरत्या कॉटेजसाठी गोवा कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथरिटीकडून मंजुरी मिळालेली आहे. यावर गेल्या महिन्यात केळशी ग्रामसभेत चर्चा झाली. त्यावर सरपंच डिक्सन वाझ यांनी केळशी पंचायतीने अद्यापही कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्याठिकाणी रस्ता बांधकाम व इतर पर्यावरणीय मुद्दे असल्याने याबाबत सीआरझेड मंडळाकडे विचारणा केली जाईल. प्रत्यक्ष पाहणीनंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल व याची सर्व माहिती ग्रामस्थांना दिली जाईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी ग्रामसभेत मांडण्यात येईल. याबाबत सर्व माहिती पारदर्शक ठेवण्यात येईल, असे सरपंच वाझ यांनी स्पष्ट केले होते.
पंचायतीने आता प्रत्यक्ष पाहणीसाठी नोटीस जारी केली आहे. पंचायत मंडळ, तक्रारदार व नेहरा यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही पाहणी ११ सप्टेंबर रोजी होणार असून त्यानंतरच परवानगीबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.