दूरसंचार मंत्रालयाच्या सुरक्षा परिषदेत माहिती : ६ लाख फोन जप्त
दूरसंचार मंत्रालयाच्या वार्षिक पश्चिम क्षेत्र दूरसंचार सुरक्षा परिषदेचे उद्घाटन करताना संचालक प्रमोद सपकाळे. सोबत इतर. (संतोष मिरजकर)
मडगाव : दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने मागील दोन वर्षांत ४ कोटींहून अधिक बनावट मोबाईल कनेक्शन तोडली व सुमारे ६ लाख चोरीला गेलेले फोन जप्त करण्यात आले आहेत. यातून सायबर क्राइमवर आळा येत आहेत, असे संचालक प्रमोद सपकाळे यांनी सांगितले.
दूरसंचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने दक्षिण गोव्यात वार्षिक पश्चिम क्षेत्र दूरसंचार सुरक्षा परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत दूरसंचार सुरक्षा आव्हानांवर आणि उपायांवर चर्चा झाली.
देशात दूरसंचार वापरकर्ते वाढल्यामुळे या क्षेत्रातील गैरवापरही वाढला आहे. यावर मात करण्यासाठी दूरसंचार विभागाने भागीदारांच्या सहकार्याने आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशक सुरू केला आहे, जो फसव्या क्रियाकलापांसाठी वापरल्या जाणाऱ्या मोबाइल नंबरचा शोध घेण्यात अत्यंत यशस्वी झाला आहे. दूरसंचार विभाग केंद्रीकृत देखरेख प्रणाली देखील अपग्रेड करणार आहे. इंटरनेट देखरेख प्रणालीची क्षमता सुधारण्यासाठी काम केले जात असल्याचेही या सत्रात सांगण्यात आले.
डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी उपाययोजना
- ‘संचार साथी’ अॅपमुळे संशयास्पद नंबर शोधण्यात आणि आर्थिक फसवणूक रोखण्यात मदत होत आहे. दूरसंचार सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सांगितले की, या उपक्रमामुळे स्पूफ कॉल्समध्ये ९७ टक्के घट झाली आहे.
- डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्ममुळे वित्तीय संस्थांना फसवणुकीची माहिती गोळा करण्यास आणि सायबर सुरक्षित वातावरण तयार करण्यास मदत होते.
- आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने ७८ लाख बनावट कनेक्शन आणि ७१ हजार पॉइंट्स ऑफ सेल बंद करण्यात आले आहेत.