वीज खात्याप्रमाणेच पीडब्ल्यूडीचाही चेहरामोहरा बदलणार

पणजी : राज्यातील खड्डेमुक्त रस्ते आणि आवश्यक दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. सार्वजनिक बांधकाम खात्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी आज स्पष्ट केले.
चतुर्थीपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिगंबर कामत यांनी मंत्रालयात खात्याचा ताबा स्वीकारला. यावेळी त्यांनी अभियंत्यांची बैठक घेऊन खात्याच्या कामकाजाचा आढावा घेण्याची सूचना केली. अभियंत्यांकडून सादरीकरण घेऊन अल्पकालीन व दीर्घकालीन आराखडा तयार केला जाईल. त्यातून खात्यास आवश्यक असलेल्या सुविधा आणि जनतेला चांगली सेवा देण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, हे निश्चित केले जाणार आहे.
खड्डे बुजविणे, रस्त्यालगतची झाडे व फांद्या हटविणे आणि आवश्यक दुरुस्ती करणे या कामांना प्राधान्य दिले जाईल. ग्रामीण व शहरी भागात कोणताही भेदभाव न करता कामे केली जातील, असेही त्यांनी नमूद केले.
मी तब्बल आठ वर्षे वीजमंत्री होतो. देशात सर्वाधिक काळ वीजमंत्री राहण्याचा मान मलाच मिळालेला आहे. मोबाईल ट्रान्सफॉर्मर, मोबाईल इलेक्ट्रिक वॅन असे अनेक उपक्रम माझ्या काळात सुरू करण्यात आले. वीज खात्याप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम खात्यातही सुधारणा घडवून आणणार आहे असे, वीज खाते सांभाळताना सुरू केलेल्या उपक्रमांची आठवण करून देत कामत म्हणाले.