खुनाच्या आरोपाखाली १० जणांवर आरोप निश्चित, एकाची निर्दोष सुटका

रेहबर खान खून प्रकरण : अतिरिक्त सत्र न्यायालयाचा आदेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th August, 11:51 pm
खुनाच्या आरोपाखाली १० जणांवर आरोप निश्चित, एकाची निर्दोष सुटका

म्हापसा : सावळे पिळर्ण येथे ऑडिट भवनजवळ झालेल्या रेहबर खुर्शिद अली खान (२२, मूळ उत्तर प्रदेश) याच्या खून प्रकरणातील १० आरोपींवर मेरशी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोप निश्चितीचा आदेश दिला आहे. तर, संदेश श्याम नाईक (२७, रा. काकोडा, सावर्डे) याची निर्दोष मुक्तता केली आहे.

आरोपी विकास उमेश यादव (२२, ओर्डा - कांदोळी), तनय सुब्राय कांदोळकर (२८, रा. वाडी कांदोळी), खतेश तुकाराम कांदोळकर (२७, रा. वाडी कांदोळी), सचिन नागेंद्र सिंग (२८, रा. ओर्डा कांदोळी), सुमन हेमंत बरीक (२३, रा. ओर्डा कांदोळी), सचिन चंद्रिका सहानी (२५, रा. ओर्डा कांदोळी), आनंद सहदेव चिकलगेकर (२१, रा. मयडे, मूळ वाळपई सत्तरी), संतोष उमेश गावस (२३, रा. आंगड म्हापसा), नीलेश आत्माराम तुपकर (२१, रा. सर्वेवाडा गिरी) व बिदेश रादेश हसुटीकर (२४, डांगी कॉलगी, म्हापसा) या दहा जणांना भा. दं. सं.च्या १४३, १४७, २०१, ३०२, ३४२, ३६५, ३९२ व १४९ कलमाखाली आरोप निश्चित करण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी दिले.

सरकारी वकिलांनी लेखी युक्तिवादात नमूद केलेली सामग्री ही वरील आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्यासाठी पुरेशी आहे. तर या कटात आणि हल्ल्याशी आरोपी संदेश नाईक याच्याशी जोडणारी कोणतीही सामग्री नसल्याने आणि आरोपी तनय कांदोळकर यानेच फक्त त्याला घटनास्थळी बोलावले होते. त्यामुळे त्याच्यावर संशय व्यक्त करण्यासाठी कोणतेही साहित्य नसल्याचे या आदेशपत्रात नमुद केले आहे.

न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील सी. रॉड्रीग्ज तर आरोपींच्यावतीने अॅड. एस. सार्दीन्हा, अॅड. टी. वेर्णेकर, अॅड. एस. धारगळकर, अॅड. ए. पर्रीकर, अॅड. एच. कारेकर, अॅड. व्ही. पोरोब व अॅड. एम. उसगावकर यांनी युक्तीवाद केला.

हा खुनाचा प्रकार १६ एप्रिल रोजी रात्री घडला होता. सावळे पिळर्ण, पर्वरी येथील ऑडिट भवनजवळ रेहबरचा मृतदेह पोलिसांना गस्तीवेळी रस्त्यावर सापडला होता. त्याचा मृत्यू मान मोडल्याने तसेच पाठीच्या कण्याला जबर इजा होऊन आणि रक्तस्त्रावामुळे झाल्याचे शवचिकित्सा अहवालातून निष्पन्न झाले होते. पोलिसांना चौकशीवेळी प्रेयशीचा छळ चालवल्याच्या रागातून प्रियकर संशयित विकास यादव याने आपल्या साथीदारांच्या सहाय्याने रेहबरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार, पर्वरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली होती. तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली जीए ०३ एएफ ७४४९ ही क्रेटा कार, जीए ०३ एच ५२०० ही पोलो कार, जीए ०३ एएस ३९२० व जीए ०३ एएस ७२०८ ही वाहने जप्त केली होती. शिवाय या गाड्यांमधून रेहबरचे कपडे, त्याचा मोबाईल, मारहाणीसाठी वापरलेला स्क्रू ड्राईव्हर व इतर हत्यारे जप्त केली होती.

रेहबर खान हा पर्वरीतील चोगम रोडवरील एस. के. युनिसेक्स सलूनमध्ये काम करत होता. शेजारील मिनी सुपरमार्केटच्या मालकीण युवतीवर त्याचे प्रेम होते. मात्र, सदर युवतीने हे नाते तोडत विकास यादव सोबत नाते जोडले होते. त्यातून रेहबर सदर युवतीला तिचे फोटो मॉर्फ करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यासह तिच्या पालकांना पाठवण्याची धमकी देऊन तिचा छळ करत होता.

हा प्रकार तिने प्रियकर विकास याला सांगितला. घटनेच्या दिवशी १५ एप्रिल २०२४ रोजी रात्री १०.३० वा. सुमारास रेहबर त्या युवतीला भेटण्यासाठी आला असता संशयितांनी त्याला कारमध्ये घालून मारहाण केली. जखमी अवस्थेत त्याला टाकून ते पसार झाले होते. दि. १६ रोजी पहाटे २ वा. सुमारास गस्तीवरील पर्वरी पोलिसांना रेहबर जखमी अवस्थेत सापडला होता. म्हापसा इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.