न्यायासाठी पालकांची आर्त हाक : कळंगुट येथे सापडला होता मृतदेह
म्हापसा : कळंगुट समुद्रकिनारी २०२१ मध्ये गूढरित्या मृत्यू झालेल्या सिद्धी नाईक (१९, नास्नोळा) प्रकरणाचे गूढ गोवा पोलिसांना अद्याप उलगडता आलेले नाही. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आज या घटनेला चार वर्षे उलटली असून तिचे आईवडील हे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकार व पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दि. १३ ऑगस्ट २०२१ रोजी सिद्धी नाईक हिचा मृतदेह कळंगुट समुद्रकिनारी अर्धनग्न अवस्थेत आढळला होता. त्यापूर्वी ती १२ ऑगस्ट सकाळपासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह सापडल्यानंतर राज्यभरातून घटनेचा निषेध करीत लोकांनी सिद्धीला न्याय मिळावा, यासाठी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता. सरकार तसेच पोलिसांसमोर प्रचंड दबाव वाढल्यानंतर कळंगुट पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद करीत हे प्रकरण गुन्हा शाखेकडे वर्ग केले होते.
मात्र, गेली चार वर्षे पोलिसांना तिच्या मृत्यूमागील गूढ शोधून काढता आलेले नाही. पोलिसांना आजपर्यंत कोणतेही धागेदोरे सापडले नसल्याने ही खून प्रकरणाची फाईल धूळखात पडून आहे.
सिद्धीचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक तर्कवितर्क काढण्यात आले होते. तिच्याकडील मोबाईलमधून पोलिसांनी पुरावे मिळवण्याचा प्रयत्न केला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा आधार घेतला होता. परंतु पोलिसांना कोणतेही पुरावे सापडले नव्हते किंवा तपास यंत्रणेला ठोस निष्कर्षापर्यंत पोहचता आले नव्हते. डिसेंबर २०२१ पासून हे प्रकरण गुन्हा शाखेकडे असून त्यांनाही या रहस्यमय मृत्यू प्रकरणाचे गूढ सोडवता आलेले नाही.
मंगळवार, १२ रोजी यासंदर्भात हतबल झालेल्या सिद्धीच्या पालकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, गेली चार वर्षे आम्ही सिद्धीला न्याय मिळण्यासाठी लढा देत आहोत. परंतु राज्य सरकार किंवा पोलिसांनी आम्हाला न्याय मिळवून दिलेला नाही.
न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच!
दिवसाढवळ्या आमची मुलगी गायब होते. तिचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह कळंगुटमध्ये समुद्रकिनारी सापडतो. ती गिरी म्हापशातून कळंगुट किनारी कशी पोहचली किंवा त्यापूर्वी तिच्यासोबत नक्की काय घडले, याचा आजपर्यंत पोलिसांना सुगावा न लागणे हे दुर्दैव आहे. खुनाचा तपास लावण्यासाठी पोलिसांना आणखीन दहा वर्षे हवीत का? सिद्धीला न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरुच राहिल, असे सिद्धीच्या पालकांनी सांगितले.