बनावट आरटीजीएस पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून सोनाराला १.४१ लाखांचा गंडा

हैदराबाद येथील हाडांच्या डॉक्टरला पोलिसांकडून अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th August, 09:40 pm
बनावट आरटीजीएस पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवून सोनाराला १.४१ लाखांचा गंडा

पणजी : बनावट आरटीजीएस पेमेंटच्या पावतीचा स्क्रीनशाॅट दाखवून पणजीतील एका सोनाराला १.४१ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी पणजी पोलिसांनी हैदराबाद येथील हाडाचा डाॅक्टर मिर्झा शेराझ अलीबेग (३८) या संशयिताला तत्काळ अटक केली.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पणजी मार्केट येथील सोनार तेजस साळकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, ११ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४.३७ वाजता एक ग्राहक सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी त्याच्या दुकानात आला होता. त्याने १ लाख ४१ हजार १५७ रुपये किमतीची सरपळी, मंगळसूत्र, एक जोडी कानातली व इतर दागिने खरेदी केले. त्यानंतर ग्राहकाने वरील रक्कम आरटीजीएसद्वारे पेमेंट केली. त्यासाठी ग्राहकाने त्याला पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवला. यानंतर तो ग्राहक तेथून गेला.

दरम्यान, सोनाराला याचा संशय आल्यानंतर त्याने वरील पेमेंटची खातरजमा केली असता, ते बनावट असल्याचे समोर आले. यानंतर त्याने याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची दखल घेऊन गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक साईन शेट्ये, कॉ. मिनेश नाईक, सुरेश नाईक, इर्मिया गुरैया बालभद्र आणि विकास नाईक आदींचे पथक तयार करून संशयिताचा शोध सुरू केला. सर्वत्र शोध घेतल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी सकाळी पथकाने मिर्झा शेराझ अलीबेग (३८) या संशयिताच्या मुसक्या आवळल्या.