मुंबईच्या तरुणाला अटक : संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) रविवारी दुपारी म्हापसा बस स्थानकावर छापा टाकून १५० ग्रॅम हायड्रोपोनिक वीड जप्त केला. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत अंदाजे १५ लाख रुपये असून, या प्रकरणी मुंबईतील २० वर्षीय ओम वेर्लेकर याला अटक करण्यात आली आहे.
एएनसीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, गोव्यातील किनारी भागांमध्ये विशेषतः आठवड्याच्या शेवटी पार्टी स्थळांवर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठा होत असल्याचे उघड झाले. मुंबईहून उच्चशिक्षित तरुण या तस्करीत सामील असल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी कारवाईची योजना आखली.
अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने म्हापसा बस स्थानकावर सापळा रचला. उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर, हवालदार उमेश देसाई, सोयरू हडफडकर, कॉन्स्टेबल गोलतकर, संजय गावकर, व्यंकटेश माईणकर आदींचा यात सहभाग होता.
संशयित ओम वेर्लेकर बस स्थानकावर संशयास्पदरित्या फिरताना दिसताच त्याला ताब्यात घेऊन झडती घेण्यात आली. त्याच्याकडून १५० ग्रॅम हायड्रोपोनिक वीड सापडला. चौकशीतून उघड झाले की, तो नियमितपणे मुंबईहून गोव्यात ड्रग्ज आणून आठवड्याच्या शेवटी पार्टी ठिकाणी पुरवठा करत असे.
जप्त मालासह संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सोमवारी त्याला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.