पर्वरी, सांगोल्डा चोरीतील सोनसाखळ्या पुणे-कोल्हापूरमधून जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th August, 11:58 pm
पर्वरी, सांगोल्डा चोरीतील सोनसाखळ्या पुणे-कोल्हापूरमधून जप्त

म्हापसा : पीडीए कॉलनी, पर्वरी आणि आल्तो बेलाविस्ता, सांगोल्डा येथे वृद्ध नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून नेणाऱ्या आरोपीकडून ३.७० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी पुणे आणि कोल्हापूरातील सराफांकडून जप्त केला आहे. या प्रकरणात गुजरातमधील नवसारी येथील राणप्रिया अजय हसमुख उर्फ ‘माच्ची’ किशोरभाई (४४) याला अटक करण्यात आली आहे.
७ जून रोजी दुपारी ३.३० वाजता सांगोल्डा येथे डॉ. अरुण वळवईकर (७५) यांच्या गळ्यातील १.९० लाखांची सोनसाखळी आरोपीने हिसकावली होती. २४ जुलै रोजी संध्याकाळी ५.३० वाजता पीडीए कॉलनी, पर्वरी येथे हरीहर (६५) यांच्या गळ्यातील १.८० लाखांची सोनसाखळी चोरीला गेली. दोन्ही वेळा आरोपीने कुरिअर डिलिव्हरी बॉय असल्याचे भासवून, पत्र देण्याच्या बहाण्याने गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून दुचाकीवरून पळ काढला.
पर्वरीतील घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून २७ जुलै रोजी आरोपीला अटक केली. चौकशीत सांगोल्डा चोरीतही त्याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे साळगाव पोलिसांनीही त्याला अटक केली.
पर्वरीतील चोरीतील १.८० लाखांची सोनसाखळी आरोपीने पुण्यातील सोनाराला विकली होती; ती पर्वरी पोलिसांनी जप्त केली. सांगोल्डा चोरीतील १.९० लाखांची सोनसाखळी कोल्हापूरमधील सराफी दुकानातून साळगाव पोलिसांनी जप्त केली. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.