पणजी : केपेतील ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला कायदा अंमलबजावणी विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्ट’ द्वारे १.०५ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाला याप्रकरणात यश आले असून, केरळस्थित गोकुल प्रकाश एम. के. (रा. पप्पिनिस्सेरी वेस्ट, कन्नूर) याच्या मुसक्या त्यांनी आवळल्या आहेत.
सायबर विभागाच्या माहितीनुसार, डिजिटल अरेस्टची घटना २० एप्रिल २०२५ रोजी घडली. अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराला व्हॉट्सअॅप कॉल करून त्याचा नरेश गोयल मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा खोटा आरोप केला. त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याचे दाखवत प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांतून टप्प्याटप्प्याने १.०५ कोटी रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. या प्रकरणी ९ जुलै २०२५ रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
याप्रकरणाचा छडा उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, तत्कालीन सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष आणि सायबर गुन्हे विभागाच्या निरीक्षक अनुष्का पैबीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनीष दाबाळे, हेडकॉन्स्टेबल विराज नार्वेकर आणि कॉन्स्टेबल शशांक गावडे यांचे पथक स्थापन करण्यात आले.
तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेत केरळच्या कन्नूर येथे जाऊन ७ ऑगस्ट रोजी गोकुल प्रकाश एम. के. (रा. पप्पिनिस्सेरी वेस्ट, कन्नूर) याला अटक केली. संशयिताच्या बँक खात्यात या फसवणुकीतील २४ लाख रुपये जमा झाले होते. संबंधित खाते १० राज्यांतील १३ गुन्ह्यांत वापरले गेले असून, एकूण ९.०२ कोटी रुपयांच्या फसवणुकीशी ते संबंधित आहे अशी धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्याला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पुढील तपास सायबर विभागाच्या पोलीस निरीक्षक अनुष्का पैबीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.