एका वर्षात धूम्रपान, तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

तंबाखू मुक्ती केंद्रातर्फे रुग्णांचे समुपदेशन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th August, 11:45 pm
एका वर्षात धूम्रपान, तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या तंबाखू मुक्ती केंद्राच्या आकडेवारीनुसार मागील एका वर्षात तंबाखू आणि धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ झाली आहे. तंबाखू सेवन करणाऱ्यांत ४६ टक्क्यांनी तर धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी अतरांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये गोमेकॉच्या तंबाखू मुक्ती केंद्रात तंबाखू सेवन करणाऱ्या ९१४ रुग्णांची नोंद झाली होती. यामध्ये तंबाखूसह खैनी, गुटख्याचे व्यसन असणाऱ्या रुग्णांचा समावेश होता. वर्ष २०२४ मध्ये ही संख्या वाढून १३३५ इतकी झाली. तर चालू वर्षात जून अखेरीस ६६२ रुग्णांची नोंद झाली होती. या केंद्रात २०२३ मध्ये धूम्रपानाचे व्यसन असणाऱ्या ४८८ रुग्णांची नोंद झाली होती. २०२४ मध्ये ती वाढून ७५२ इतकी झाली.

तंबाखू मुक्ती केंद्रातर्फे तंबाखूचे व्यसन असणाऱ्या रुग्णांचे समुपदेशन केले जाते. तसेच त्यांच्यावर प्राथमिक टप्प्यातील कर्करोगाबाबत चाचण्या केल्या जातात. माध्यमे आणि पथनाट्यांद्वारे जागृती केली जात आहे. दरवर्षी तंबाखू विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. २०१६-१७ मध्ये देशभर झालेल्या एका सर्व्हेक्षणनुसार गोव्यात तंबाखूचे सेवन करण्याची टक्केवारी राष्ट्रीय सरासरी पेक्षा खूप कमी आहे. याशिवाय ई सिगारेट चे धोके समजून सांगण्यासाठी देखील कार्यशाळा घेतल्या जात असल्याचे उत्तरात म्हटले आहे.

सहा जणांना तोंडाच्या कर्करोगाचे निदान

उत्तरात म्हटले आहे की, आरोग्य खात्यातर्फे जुलै २०२४ पासून कर्करोग निदान अभियान राबवले जात आहे. याद्वारे आतापर्यंत १,२४५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यातील ८१ जणांना कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आढळली होती. तर ६ जणांना तोंडाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले होते.