कोलवाळ कारागृह सुरू झाल्यापासून नोकर भरती ठप्प
म्हापसा : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील तुरुंग प्रशासनात तब्बल ११६ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. यात ५ सहाय्यक अधीक्षक, ६० वॉर्डन (जेल गार्ड) आणि १० पैकी १० मेट्रन (महिला जेल गार्ड) यांचा समावेश आहे. मेट्रन पदांसाठी गेल्या २० वर्षांपासून तर वॉर्डन पदांसाठी १३ वर्षांपासून म्हणजेच मध्यवर्ती कारागृह सुरू झाल्यापासून भरती प्रक्रिया झालेली नाही.
सरकारने तुरूंग प्रशासनासाठी २७४ पदांना मंजुरी दिली आहे. यातील १५८ पदे भरलेली असून ११६ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी ६ पैकी ३, कल्याण अधिकारी १ पैकी एक, ब्रदर (नर्स) ५ पैकी चार, महिला परिचारिका २ पैकी दोन, हेड वॉर्डन तथा शारीरिक प्रशिक्षक १ पैकी एक, टेलरिंग प्रशिक्षक २ पैकी दोन, सहाय्यक अधीक्षक १४ पैकी ५, हेड मेट्रन ५ पैकी ३, इलेक्ट्रिशियन ४ पैकी ३, हेड वॉर्डन १५ पैकी ३, वॉर्डन १४८ पैकी ६०, मेट्रन १० पैकी १०, कार्यालयीन कनिष्ठ कारकून १५ पैकी ९, चालक ११ पैकी ४ व एमटीएस १० पैकी ६ अशी एकूण ११६ कर्मचारी पदे रिक्त आहेत.
तुरूंग महानिरीक्षक १, सहाय्यक महानिरीक्षक १, अधीक्षक १, अतिरिक्त अधीक्षक २, अकाऊंटंट १, सुतारकाम (कारपेंटरी) प्रशिक्षक १, उपअधीक्षक ८, कृषी सहाय्यक १, कार्यालय अधीक्षक १, मुख्य कारकून १, कनिष्ट स्टेनोग्राफर १, वरिष्ठ कारकून ६ ही पदे मंजुरीनुसार भरलेली आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाचे ३० मे २०१५ रोजी घटकराज्य दिनी तत्कालिन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते लोकार्पण केले होते. त्यानंतर आग्वाद तुरूंग आणि सडा उपतुरूंगासह म्हापसा व मडगाव न्यायालयीन कोठडी विसर्जित केल्या होत्या.
रोजंदारी कर्मचाऱ्यांवर सुरक्षा जबाबदारी
केंद्रीय कारागृहाला १० वर्षे झाली असून त्यापासून अद्याप सरकारने कर्मचारी भरती केलेली नाही. त्यामुळे वॉर्डन आणि मेट्रन सारख्या कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. मेट्रन कर्मचारी रिक्तपदामुळे महिला गृहरक्षक आणि महिला सुरक्षा रक्षकांमार्फत महिला कैद्यांची सुरक्षा व देखभाल ठेवली जात आहे. प्रत्यक्षात कारागृहातील अंतर्गत सुरक्षा ही तुरूंग प्रशासन कर्मचाऱ्यांचीच असते. तिथे तुरूंग प्रशासन व्यतरिक्त इतर कर्मचाऱ्यांना प्रवेश मनाई केली जाते. मात्र, मेट्रन कर्मचाऱ्यांचा अभाव असल्यामुळे गृहरक्षक व सुरक्षारक्षक या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कैद्यांच्या सुरक्षेतेसाठी तैनात करण्यात आले आहे.