कोणत्याही कामात किंवा जीवनात शिस्त असायलाच हवी. कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग शिखर गाठणाऱ्या व्यक्तीच्या यशाचे गमक हे त्याच्या शिस्तबद्ध प्रयत्नात असते. यश प्राप्त करण्यास परिश्रमाबरोबर शिस्तीलाही पर्याय नसतो. काम कोणतेही असो, ते ठराविक वेळेत होणे आवश्यक असते. खासगी व सरकारी खात्यांमध्ये अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळा ठरवून दिल्या जातात. खासगी कंपन्यामध्ये हजेरीसाठी पंचिंग मशीन असते. यामुळे कर्मचाऱ्याची येण्याची व जाण्याची वेळ आपोआप नोंद होत असते. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत असे म्हणता येत नाही. कार्यालयात प्रवेश केल्यानंतर त्यांना हजेरीसाठी हजेरीपटावर स्वाक्षरी करावी लागते. बरेचदा कर्मचारी अर्धा-अर्धा तास उशिरा येतात. येण्याची वेळ नोंद होत नसल्याने उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे काहीच बिघडत नाही. पुन्हा काही कर्मचारी कार्यालयात आल्यानंतर अर्धा, अर्धा तास चहा पिण्यासाठी बाहेर जातात. कमी - अधिक प्रमाणात सर्व सरकारी कार्यालयांत हा प्रकार चालतो.
खात्याचे मंत्री अधेमधे कार्यालयांना अचानक भेटी देतात तेव्हा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडते. उशिरा कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री देत असतात. यापूर्वी बऱ्याच बऱ्याच मंत्र्यांनी असे इशारे दिले. त्याचा विशेष असा परिणाम झाला नाही.
हजेरीपटावर दररोज सही केली की महिन्याचे वेतन मिळते. किती काम केले, याचा हिशेब कोणतेही खाते ठेवत नाही. आता पंचायत संचालनालयाने एआयवर आधारित फेसियल अटेंडन्स पद्धतीचा अवलंब केला आहे. पंचायतीबाहेर लावलेल्या यंत्रावर चेहरा टिपून त्या आधारे वेळेसह कर्मचाऱ्याची हजेरी नोंद होणार आहे. यामुळे कोणता कर्मचारी किती वाजता कार्यालयात पोचतो, त्याची नोंद होणार आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्र्यांहस्ते फेसियल रिकॉग्निशन एआयवर आधारित हजेरी यंत्रणेचे उद्घाटन झाले. यामुळे आता पंचायत खात्यात फेसियल रिकॉग्निशन हजेरी यंत्रणा सुरू झाली आहे. टप्प्याटप्प्याने सरकारच्या इतर खात्यामध्ये ही यंत्रणा सुरू होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
आजचे युग डिजिटल युग आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलचा वापर सराईतपणे करत आहेत. स्मार्ट फोन वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे. कनेक्टिविटीतही सुधारणा होत आहे. मेसेज पाठविण्यासह आर्थिक व्यवहार आता मोबाईलवर होऊ लागले आहेत. सरकारच्या सेवा तसेच विविध प्रमाणपत्रे आता ऑनलाईन मिळू लागली आहेत. या काळात हजेरीपटावरील सहीवर आधारित हजेरीची पद्धत कालबाह्य झालेली आहे. यामुळे आता सर्व खात्यांत फेसियल रीकॉग्निशनवर आधारित हजेरीची पद्धत सुरू व्हायला हवी. तसेच उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई देखील व्हायला हवी. नाही तर वेळेची नोंदणी झाली, पण उशिरा येणाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर फेसियल रिकॉग्निशन हजेरी पद्धतीचा काय उपयोग? ही पद्धत सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेबाबत शिस्त लावण्यास पूरक ठरेल, एवढे मात्र निश्चित.