डिचोली : भामई - पाळी येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाऊन पळालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना डिचोली पोलिसांनी गजाआड केले असून, चोरी गेलेले सोन्याचे मंगळसूत्र परत मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे.
घटनेत अटक करण्यात आलेले आरोपींचे नाव अब्बास अस्लम जाईदी (रा. ठाणे, महाराष्ट्र) व शरीफ शहा शमशेर शहा (रा. नाशिक, महाराष्ट्र) असे असून, त्यांनी डिचोली तालुक्यातील भामई - पाळी परिसरात एका महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले होते. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी चोरीचे मंगळसूत्र पुण्यातील एका सराफी दुकानदाराला विकल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने पुण्यातील सराफाकडून मंगळसूत्र जप्त केले.