जमीन हडप प्रकरण : रॉयसन रॉड्रिग्स आणि मोहम्मद सुहैल यांना अटक

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
10th August, 04:47 pm
जमीन हडप प्रकरण : रॉयसन रॉड्रिग्स आणि  मोहम्मद सुहैल यांना अटक

पणजी : बार्देश येथील हणजूण जमीन हडप प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने (एसआयटी) रॉयसन रॉड्रिग्स या संशयिताला अटक केली आहे. याशिवाय आसगाव जमीन हडप प्रकरणात एसआयटीने मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला पंधराव्यांदा अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील सर्व्हे क्रमांक ४८६/६ येथील १,८७५ चौ.मीटर जमीन हडप प्रकरणी विल्मा डिसोझा यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, तक्रारदाराच्या पूर्वजांची वरील जमीन संशयित ब्रांका दिनिज, पावलिना दिनिज, मारियानो गोन्साल्विस आणि रॉयसन रॉड्रिग्ज, मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस, राजकुमार मैथी, डॅन्वर डिसोझा आणि इतरांनी हडप केल्याचे म्हटले होते. याची दखल घेऊन तत्कालीन एसआयटीचे निरीक्षक सुरज सामंत यांनी वरील संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्याची बदली झाल्यानंतर वरील प्रकरण एसआयटीचे उपनिरीक्षक योगेश गडकर याच्याकडे वर्ग करण्यात आले. त्यांनी या प्रकरणी चौकशी करून गुरुवार ७ रोजी रॉयसन रॉड्रिग्स या संशयिताला अटक केली आहे. दरम्यान संशयिताने म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार ११ रोजी होणार आहे.

मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला पंधराव्यांदा अटक केली

एसआयटीने अन्य एका प्रकरणात मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला अटक केली आहे.संशयित सुहैल याला पंधराव्यांदा अटक करण्यात आली  आहे. या प्रकरणी अंजू डिसिल्वा यांनी  २०२२ मध्ये एसआयटीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, संशयितांनी तिच्या पूर्वजांची आसगाव येथील सर्व्हे क्रमांक ३७/४ मधील २,२५० चौ.मीटर जमीन बनावट दस्तावेज तयार करून हडप करण्यात आल्याची तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन एसआयटीचे तत्कालीन निरीक्षक सखाराम परब यांनी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला होता. त्यानंतर या प्रकरणात त्यांनी संशयित रॉयसन्स रॉड्रिग्स याला अटक केली होती. त्यानंतर रॉड्रिग्स याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. या प्रकरणात एसआयटीने न्यायालयीन कोठडीत असलेला मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल फर्नांडिस याला अटक केली आहे.