वास्को : बोगमाळो येथील रंघवी इस्टेट रस्त्यावर शुक्रवारी रात्री पावणे आठच्या दरम्यान दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात बोगमाळो येथील आल्बिन राजू याचा मृत्यू झाला. तर, दुसऱ्या दुचाकीवरील फ्लोरियना लुकास (बोगमाळो) व मागे बसलेली व्यक्ती जखमी झाली. फ्लोरियना व अन्य एक व्यक्ती दुचाकीने दाबोळी चौकातून बोगमाळोकडे चालले होते. ते दुचाकीसह रंघवी इस्टेट रस्त्यावर पोहचले असता, समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या दुचाकीची धडक बसली. त्यामुळे दुचाकींसह ते तिघेजण रस्त्यावर आपटले. जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. तेथून आल्बिन राजू याला पुढील उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात येत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्लाटो कार्वालो पुढील तपास करीत आहेत.