जुने जाऊ द्या मरणालागुनी...

मृत्यूशी संबंधित रूढी, अंधश्रद्धा, कालबाह्य झालेल्या प्रथा सोडून मानवी भावनांना महत्त्व देण्याची गरज आहे. दुःखाच्या प्रसंगी कर्मकांड, अमानवी प्रथा बाजूला ठेवून, वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे.

Story: विचारचक्र |
08th August, 11:40 pm
जुने जाऊ द्या मरणालागुनी...

घरातल्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू, मग ती व्यक्ती पुरुष असो की महिला, हा वेगवेगळ्या कुटुंब सदस्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे दुःखद प्रसंग असतो. काही लोकांसाठी ती जबाबदारीची जाणीव असते. अकाली मोठेपण यायचा प्रसंग असतो. काहींना आभाळ कोसळण्याचा प्रसंग असतो, तर काहींना आयुष्यभर भरून न निघणारी पोकळी असते. एका मृत्यूचे वेगवेगळे परिणाम हे अनेकांवर होत असले तरी जीवनसाथीच्या आयुष्यात त्याचे अधिक खोल आणि गंभीर परिणाम होत असतात. 

इतर सदस्यांसाठी परंपरेने चालून आलेली कर्मकांडे त्या त्या प्रसंगी करणे ही जबाबदारी असते. त्यात आपल्याला पटत नसले, त्यात काही तथ्य नाही हे माहीत असले, तरी या गोष्टी बदलण्याच्या कोणी विचार करत नाहीत. आणखी कुठे नाहीत तेवढ्या अंधश्रद्धा मृत्यूप्रसंगी असतात. ज्या ज्या गोष्टी इतर प्रसंगांमध्ये आपण करीत नसतो, तेवढ्या सगळ्या गोष्टी या काळात आपल्या समाजात केल्या जातात. तरीही बदललेल्या काळाला अनुसरून, आपल्या भावनांना ठेच न लावता, त्यात काय काय बदल आपण करू शकतो, याचा विचार प्रत्येक विचारी माणसाने केला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत अन् त्यातला फोलपणा आपण आपसात कायम बोलत असतो. त्याचाच एक भाग म्हणून एक पाऊल पुढे टाकून, आपण काय बदल करू शकतो याचा विचार आपण विचारी माणसे असलो तर करायला हरकत नाही. प्रत्येक गावागावांप्रमाणे या प्रथा वेगवेगळ्या असतात. तरी काही प्रथा समान व बहुतेक सगळ्या कालबाह्य झालेल्या असतात, हे खरे.

पतीचा मृत्यू झाला तर बारा दिवस त्याच्या पत्नीचे तोंड इतर महिलांनी न पाहण्याची प्रथा काही गावांमध्ये आहे. त्यात आपल्या कुंकवाला धोका असू शकतो, असा गैरसमज त्यामागे असतो. खरे तर जिचा जीवनसाथी जातो, तेव्हा तिला सर्वात जास्त गरज असते ती धिराची, सोबतीची अन् तेव्हाच जर आपण तिला कोपऱ्यात ढकलले तर माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे तरी आपण राहणार का? जाऊन बघा त्या व्यक्तीला किती बरे वाटते? अन् कुणाला भेटायला जाताना कायम तिचे दु:ख हलके कसे होईल, हेच बघितले पाहिजे. नाहीतर पतीशिवाय काय काय तिला करता येणार नाही, याची आठवण करून देऊ नये. तिच्या दु:खाची दरी अजून खोल करायची नसते. तसेच पुरुषालाही त्याची पत्नी गेली तर आता त्याच्या जेवणाखाणाचे कसे होणार, याची काळजीयुक्त भीती त्याच्या मनात कुणी घालायची नसते.

बाराव्या दिवशी आणलेली साडी, टॉवेल त्यांच्या अंगावर टाकणे हे अमानुष असते. मायेचे वस्त्र म्हणून ज्याची ओळख आहे, ते देताना ही पद्धत? मग त्यात कसली माया? अन् ते वस्त्र ते टॉवेल नंतर न वापरण्याचीही प्रथा. दोन्ही चुकीचेच. द्यायचे असल्यास व्यवस्थित द्यावे, अन्यथा देऊ नये अन् दिलेल्याचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करावा.

‘बारा दिवसापर्यंत नातेवाईकांनी आणलेला खाऊ आपण ठेवू नये, कुणाला देऊ नये,’ असाही समज आहे. आता बहुतेक लोक चहा, साखर, भाजी, बिस्कीट, लहान मुलांना काहीतरी घरी तयार केलेले जेवण वगैरे पदार्थ घेऊन येतात. ते आणलेले सामान घरच्या मंडळींना बाहेर जाता येत नाही, मुलांना हवे नको ते मिळत नाही म्हणून लोक आणतात. त्याचा अर्थ ते वाईट नसून पवित्र भावनेने, मायेने आणलेले असते. त्याचा योग्य वापर करावा. बाराव्याचे जेवणात घरात सगळे जिन्नस पंचपक्वान्न केले जातात. मग वर्षभर ते करायला मिळणार नाहीत, ही त्यामागची धारणा. येणारे जाणारे आवर्जून मयत झालेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ बनवून आणतात. फळे, फराळ याने पान भरगच्च भरलेले असते. सकाळपासून पोटात काही नसल्याने प्रत्येकाला भूक लागलेली असते. तरीही त्या ताटाला हात न लावता प्रत्येकजण त्यातला एक कण उचलून पूर्ण पान बाहेर फेकून देतो. ते सगळे जेवण बाहेर फेकणे, हे आपल्या नैसर्गिक व राष्ट्रीय संसाधन संपत्तीचा अपव्यय आहे. पुढ्यात आलेले असे भुकेल्या पोटाने बाहेर फेकणे, हे बरोबर नाही. सोबत घरात राहिलेला स्वयंपाकही बाहेर फेका म्हणतात. मग घरातल्या लोकांनी पुन्हा स्वयंपाक करावा, ही अपेक्षा. हेही वेळेला अन् काळाला धरून नाही. आहे ते फेकून परत स्वयंपाक करा, हे का म्हणून? अन्नाच्या एका दाण्यालाही आपल्या संस्कृतीत महत्व आहे. त्या परमब्रम्हाला अव्हेरणे बरोबर आहे का? गावागावांतून जाणत्या बुद्धिवादी लोकांनी सगळ्यांना आवाहन करून स्वत: अन्नग्रहण करायला सुरवात केली पाहिजे.

आजकाल मृत व्यक्तीला मृत्यू नक्षत्र वाईट असल्याचा समज असतो. त्यासाठी मग होमहवन, शांती करवून घेणे. त्यासाठी दहा हजारांपासून ते पन्नास हजारांपर्यंत खर्च येणे, हे प्रत्येक मृत्यूप्रसंगी आहेच. त्यात मयताला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे दान करणे, त्यासाठीचा खर्च आला. हे सगळे त्या माणसाकडे खरेच पोचते का? द्यायचेच असल्यास मृत्यू झालेल्याच्या नावाने व आठवणीने कुणा गरजवंताला देणे काय अयोग्य? 

अपघात अन् हृदयविकाराने आलेले मृत्यू हे अनपेक्षितपणे येतात. त्यावेळेस आपल्याला धक्का बसतो. परत परत आपण विचार करायला लागतो की, असे का घडले? काही ‘आतले - बाहेरचे’ तर नाही ना? मग असे का घडले, याचा धांडोळा घेण्याची क्रिया सुरू होते. तेव्हा परिस्थितीचे अवलोकन व्यवस्थित केले नाही तर मग सुरू होते अंधश्रद्धेची वाट. या बाबाकडे जा, नी त्या भगताकडे जा. प्रत्येक जिवंत माणसाला सुख-दु:ख असतेच. त्याचा फायदा घेऊन, मग हे करायला पाहिजे अन् ते सुरू होते. हजारो रुपये खर्च केल्यानंतरही मनाला काही शांती लाभत नाही. प्रत्येक माणसाला संशयाने बघायची एक सवय होऊन जाते. ‘याला आपले बरे झालेले पाहवत नाही, त्याने काहीतरी करणी केली असावी,’ असे म्हणत आपण शेजारप्रेम अन् आपले मनस्वास्थ्य दोन्हीही हरवतो. पण हा विचार आपल्या मनात येत नाही की हृदयविकार वा कॅन्सरसारखे आजार हे अनुवांशिक असतात. त्यासाठी इतर सदस्यांनी प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत अन् त्रास असेल तर वैद्यकीय उपचार घेतले पाहिजेत. अपघात झाला तर वाहन चालवताना इतरांनी सावधानता बाळगावी. वाहन चालवताना पूर्ण लक्ष रस्त्यावरच असले पाहिजे. नियम पाळून गाडी चालवण्यासारखा नियम त्यानिमित्ताने आपणच आपल्याला घालून घेऊ शकतो. इतरांना सांगू शकतो. त्यामुळे आपल्यासह कुणा दुसऱ्या निष्पाप माणसाचा जीव जाणार नाही.

पतीच्या मृत्यूप्रसंगी पत्नीला बाहेर आणून तिची विटंबना करू नये. मयताचे कपडे न काढता त्याचे अंतिमसंस्कार करावे, कारण हेच काळाला व आपल्या मानवधर्माला अनुसरून आहे. कवी केशवसुतांच्या तुतारी कवितेतील विचार आजही लागू आहेत.

जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सढत न एक्या ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका...



- नमन सावंत (धावस्कर)  

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्या 

व साहित्यिक आहेत.)