गोव्याची विजयी घोडदौड कायम; जम्मू-काश्मीर, डॅमडीडीवर मात

१५वी हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd August, 12:16 am
गोव्याची विजयी घोडदौड कायम; जम्मू-काश्मीर, डॅमडीडीवर मात

पणजी : गोवा ज्युनियर महिला हॉकी संघाने १५व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या आपल्या मोहिमेला शानदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात गोव्याच्या मुलींनी जम्मू-काश्मीरवर २-१ असा थरारक विजय मिळवला.
पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करत गोव्याने सलग दोन गोल करत सामन्यावर वर्चस्व मिळवले. १६व्या मिनिटाला प्राची यादव हिने पहिला गोल केला, त्यानंतर १९व्या मिनिटाला रुबी राठोड हिने दुसरा गोल करत आघाडी वाढवली. दुसऱ्या सत्रात जम्मू-काश्मीरकडून जोरदार बचाव आणि एक प्रत्युत्तरात्मक गोल नोंदवला गेला, मात्र गोव्याच्या संघाने शिस्तबद्ध बचाव करत विजय आपल्या खात्यात जमा केला.
पहिल्या विजयामुळे आत्मविश्वासाने भरलेल्या गोव्याने दुसऱ्या सामन्यात दादरा-नगर हवेली व दमण-दीव (डॅमडीडी) संघावर ४-० असा दणदणीत विजय मिळवला. सामन्याच्या ४व्या मिनिटालाच प्राची यादव हिने शानदार सुरुवात करत पहिला गोल केला. त्यानंतर मधल्या फळीतून प्रियंका वाल्मिकी हिने १०व्या व २५व्या मिनिटाला सलग दोन गोल करत आघाडी भक्कम केली. अखेरच्या टप्प्यात ५९व्या मिनिटाला प्रियांकाने आणखी एक गोल करत सामना गोव्याच्या नावावर केला.
गुणतालिकेत अग्रस्थान
सलग दोन विजयांमुळे गोवा संघाने आपल्या पूलमध्ये अग्रस्थान पटकावले असून, पुढील फेऱ्यांसाठी त्यांनी आपली तयारी सिद्ध केली आहे. संघाचा संघभावना, खेळातील चपळता आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतोय. स्पर्धेत गोव्याचे खेळाडू आता चॅम्पियनशिपसाठी प्रबळ दावेदार म्हणून पुढे जात आहेत.
गोव्याचा महिला हॉकी संघ.