अमली पदार्थांच्या गुन्ह्यात स्थानिकांच्या अटकेच्या प्रमाणात दुपटीने वाढ

२०२१ मध्ये २९, २०२४ मध्ये ५५ जणांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd August, 12:10 am
अमली पदार्थांच्या गुन्ह्यात स्थानिकांच्या अटकेच्या प्रमाणात दुपटीने वाढ

पणजी : राज्यात २०२१ ते २०२४ या चार वर्षांची तुलना करता अमली पदार्थांच्या संबधित गुन्ह्यांत अटक झालेल्या स्थानिकांची संख्या जवळपास दुपटीने वाढली आहे. गोवा पोलिसांनी २०२१ मध्ये अमली पदार्थांच्या संबंधित गुन्ह्यांत २९ स्थानिकांना अटक केली होती. २०२४ मध्ये ही संख्या वाढून ५५ झाली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती मिळाली आहे. याबाबत आमदार विजय सरदेसाई यांनी अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये पोलिसांनी अमली पदार्थांशी संबंधित १२१ खटले दाखल केले होते. यामध्ये एकूण १३८ जणांना अटक करण्यात आली होती. यात २९ स्थानिक, ८७ गोव्याबाहेरील तर २२ विदेशी नागरिक होते. २०२२ मध्ये १५४ खटल्यांत १९० जणांना अटक झाली. यात ५७ स्थानिक, १०४ गोव्याबाहेरील व २९ विदेशी नागरिक होते. २०२३ मध्ये १४० खटल्यात १६५ जणांना अटक करण्यात आली. यात ४७ स्थानिक, ९८ गोव्याबाहेरील व २१ विदेशी नागरिक होते.

गोवा पोलिसांनी २०२४ मध्ये अमली पदार्थांच्या संबंधित १६२ खटले दाखल केले होते. यामध्ये एकूण १९२ जणांना अटक करण्यात आली होती. यात ५५ स्थानिक, ११३ गोव्याबाहेरील तर २४ विदेशी नागरिक होते. तर, १ जानेवारी ते ३० जून २०२५ दरम्यान ८८ खटल्यांत ११४ जणांना अटक करण्यात आली. यात ३७ स्थानिक, ६० गोव्याबाहेरील व १७ विदेशी नागरिक होते. वरील साडेपाच वर्षांत अटक झालेल्या ७८२ पैकी २२५ (२८.७७ टक्के) स्थानिक होते.

साडेपाच वर्षांत ९७.२१ कोटींचे अमली पदार्थ जप्त

उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, मागील साडेपाच वर्षांत पोलिसांनी ९७.२१ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यातील सर्वाधिक ७३.९७ कोटी रुपयांचे अमली पदार्थ चालू वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत जप्त केले आहेत.