सरकार अलर्ट : लैंगिक अत्याचार, खून, ड्रग्ज, विनयभंग प्रकरणांत वाढ
म्हापसा : राज्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मुख्य अशा काही गुन्ह्यांची टक्केवारी एक टक्का कमी झाली आहे. मात्र, लैंगिक अत्याचार, खून, ड्रग्ज, नोकरी घोटाळे व विनयभंग प्रकरणांत बरीच वाढ झाली आहे.
विधानसभा अधिवेशनात आमदार संकल्प आमोणकर यांनी विचारलेल्या राज्यातील वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यात सरकारी भूमिका या शिर्षकाखालील प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लिखित उत्तर दिले. त्यानुसार, २०२३-२४ च्या आर्थिक वर्षात १०२४ तर २०२४-२५ आर्थिक वर्षात १०२२ गुन्हे नोंदवले गेल्याची माहिती दिली आहे. २०२३-२४ साली चोर्या ४००, बलात्कार १०५, खून २७, ड्रग्ज १२७, हल्ले २३४, नोकरी घोटाळे १५ व विनयभंग ११६ तर, २०२४-२५ साली चोरी ३४८, बलात्कार ११४, खून २९, ड्रग्ज १६१, हल्ले २०८, नोकरी घोटाळे ४२ व विनयभंग १२० असे गुन्हे पोलिसांत नोंद झाले आहेत. २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये फक्त चोर्या आणि हल्ल्यांची प्रकरणे कमी झाली आहेत.
सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी पीसीआर व्हॅनद्वारे दिवसरात्र तसेच पोलीस कर्मचार्यांमार्फत गस्त घातली जाते. बीट कर्मचारी आपल्या स्त्रोतांकडून माहिती गोळा करतात. प्रमुख नागरिक, स्वयंसेवी संस्था व शांतता समितींसोबत संवाद बैठका घेतल्या जातात. महिलांच्या मदतीसाठी महिला मदत कक्ष तयार केलेला आहे.
तपासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नवीन कायद्यानुसार ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक व वैज्ञानिक मदत घेतली जाते. सायबर फॉरेन्सिक, डिजिटल पुरावे व वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या चौकशी अधिकार्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळा घेतल्या जातात. वरिष्ठांकडून दैनंदिन तपास प्रगतीचा आढावा घेतला जातो. सायबर क्राईम तपासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी १९३० हेल्पलाईन सेंटर आणि एआय-एमएल लॅबची स्थापना केली आहे. गंभीर गुन्हे कमी करण्यासाठी नवीन गुणवत्ता सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे.
किनारी भागात पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी या भागातील पोलीस स्थानकांकडून दिवसभर नियमित गस्त घातली जाते. आठवड्याच्या शेवटी साध्या वेषातील अतिरीक्त पोलीस संवेदनशील पर्यटन क्षेत्रात तैनात केले जातात.
सार्वजनिक सुरक्षा, गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत
ड्रग्ज तस्करीचे नेटवर्करोखण्यासाठी ग्रामीण संपर्क मजबूत केला जात आहे. तसेच शाळा, महाविद्यालये व सार्वजनिक ठिकाणी जागरुकता कार्यक्रम राबवले जातात. जनतेसाठी उपलब्ध पोलीस हेल्पलाईनवर २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये ६.८५ टक्के कॉल्समध्ये घट झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन कार्यरत आहे. गस्तीसाठी १०६ वाहने कार्यरत आहेत. सायबर गुन्ह्यांच्या जागरुकतेसाठी सायबर सुरक्षा कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांमध्ये राबवले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.