पणजीत महिलांचे नेतृत्व ठरतेय स्वच्छतेत आदर्श

पंतप्रधानांच्या ‘मन की बात’मध्ये पणजी शहराचाही उल्लेख

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th July, 02:41 pm
पणजीत महिलांचे नेतृत्व ठरतेय स्वच्छतेत आदर्श

नवी दिल्ली : पणजीमध्ये कचऱ्याचे १६ प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते. या उपक्रमाचे नेतृत्वही महिलाच करत आहेत. पणजीला ‘राष्ट्रपती पुरस्कार’ देखील मिळाला आहे. स्वच्छता हे एका दिवसाचे किंवा एका वेळचे काम नाही. आपण दररोज, वर्षातील प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ, तेव्हाच देश खरोखर स्वच्छ राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या रेडिओवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १२४व्या भागात पुन्हा एकदा ‘स्वच्छते’वर भर दिला. यावेळी त्यांनी गोव्याच्या पणजी शहराचाही उल्लेख केला. तसेच भोपालमधील ‘सकारात्मक सोच’ टीम आणि छत्तीसगडमधील बिल्हा येथील महिलांच्या कार्याची प्रशंसा केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ही टीम २०० महिलांची आहे, जी १७ उद्यानांची स्वच्छता करण्याबरोबरच लोकांमध्ये जनजागृतीही करत आहे. शहरातील १७ उद्यानांची एकत्रित स्वच्छता करणे, कापडी पिशव्या वाटणे ही कामे करीत आहेत. त्यांच्या अशा प्रयत्नांमुळेच भोपाल ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये खूप पुढे गेला आहे.

‘स्वच्छ भारत मिशन' लवकरच आपल्या ११ वर्षांचा टप्पा पूर्ण करणार आहे, पण या अभियानाची ताकद आणि गरज आजही तितकीच भासते. अनेकदा काही लोकांना काही काम अशक्य वाटते. त्यांना वाटते, हे खरेच शक्य होईल का? पण जेव्हा संपूर्ण देश एकाच विचारासाठी एकत्र येतो, तेव्हा अशक्यही शक्य होते. ‘स्वच्छ भारत मिशन’ हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे.

उत्तराखंडमधील कीर्तिनगर येथील लोक डोंगराळ भागात कचरा व्यवस्थापनात आदर्श उदाहरण निर्माण करत आहेत. त्याचप्रमाणे, मंगळुरूमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन केले जात आहे. अरुणाचल प्रदेशामधील रोईंग हे एक छोटेसे शहर आहे. एके काळी तेथील कचरा व्यवस्थापन हे लोकांच्या आरोग्यासाठी मोठी समस्या ठरत होती. मात्र, तेथील लोकांनी ही जबाबदारी स्वतःवर घेतली. ‘ग्रीन रोईंग उपक्रम’ सुरू करण्यात आला आणि नंतर पुनर्वापराच्या कचऱ्यापासून एक सुंदर उद्यान उभारण्यात आले.

स्वच्छतेसाठी पणजी शहराचा ‘मन की बात’ कार्यक्रमात उल्लेख केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. पणजी शहराला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ही बाब स्वच्छ व हरित गोव्यासाठी सतत कार्य करण्यास प्रेरणा देणारी आहे : डॉ.  प्रमोद सावंत, मुख्यमंत्री


हेही वाचा