रशियातून गोव्यात आली अन् गोकर्ण डोंगराच्या गुहेत स्थिरावली

अध्यात्माची आवड : रशियन महिलेसह दोन मुलांना सुरक्षित स्थळी हलविले

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
9 hours ago
रशियातून गोव्यात आली अन् गोकर्ण डोंगराच्या गुहेत स्थिरावली

जोयडा : गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगर परिसर गुहांनी भरलेला असून पावसाळ्यात तो कोसळण्याची भीती आहे. सापांसारख्या धोकादायक विषारी प्राण्यांचे निवासस्थान असलेल्या डोंगरातील एका गुहेत एक परदेशी महिला तिच्या दोन मुलांसह राहत होती. गोकर्ण पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्या महिलेला आणि मुलांना तेथून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

जंगलात गस्त घालत असताना पोलिसांना रामतीर्थ डोंगरावर गुहेत कोणीतरी वास्तव्य करीत असल्याचे दिसून आले. पोलीस त्या डोंगराच्या माथ्यावर गुहेत पोहोचले तेव्हा त्यांना रशियन महिला नीना कुटिना (वय ४०) आढळली. ती तिच्या प्रेमा (६) आणि अमा (४) या दोन मुलांसह राहत होती. त्या परदेशी महिलेची चौकशी करण्यात आली असता तिला पूजा आणि ध्यान करण्यात आवड असल्याचे समजले. त्यासाठी ती गोव्याहून तिच्या मुलांसह गोकर्णला आली व रामतीर्थ डोंगरातील गुहेत राहिली. तिथे राहून ती देवाचे ध्यान करीत होती.

पोलिसांनी तिला सुरक्षित स्थळी नेण्यासाठी प्रयत्न केले असता आपण इथेच राहणार असल्याचे सांगितले. मात्र, याठिकाणी दरड कोसळणे तसेच विषारी प्राण्यांचे राहण्याचे ठिकाणी असून तू येथे सुरक्षित राहू शकत नसल्याचे सांगितले. तुला आम्ही सुरक्षित स्थळी सोडतो, असे सांगून डोंगरातून खाली आणले.

सध्या नीना कुटीना हिच्यासह तिच्या मुलांना महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाखाली कुमटा तालुक्यातील बंकीकोडलू गावातील शंकरा प्रसाद फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी संलग्न असलेल्या सरस्वती स्वामीजी आश्रमात ठेवण्यात आले.

या महिलेने भारतात राहण्याच्या उद्देशाने तिचा आणि तिच्या मुलांचा पासपोर्ट आणि व्हिसाची माहिती देण्यास पोलिसांना नकार दिला आहे. तिने येथे राहण्याच्या उद्देशाने त्या गुहेत किंवा जंगलात पासपोर्ट टाकला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सुरक्षितेच्या कारणास्तव तिला व मुलांना आता सरस्वती स्वामीजी आश्रमात नेऊन महिला आणि बाल कल्याण विभागाच्या महिला स्वागत केंद्रात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी गोकर्ण व जिल्हा पोलीस विशेष तपास करीत आहेत.

महिलेचा पासपोर्ट, व्हिसा सापडला

गोकर्ण पोलीस आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक संयुक्त शोधमोहीम राबवली. या मोहिमेत रशियन महिलेचा पासपोर्ट, व्हिसा तसेच इतर कागदपत्रे सापडली आहेत. त्यानुसार ती १७ एप्रिल २०१७ पासून भारतात वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. रेकॉर्ड्सनुसार ती नेपाळलाही गेली होती. तेथून ती ८ डिसेबर २०१८ साली भारतात आली होती. त्यामुळे महिलेची सखोल चौकशी केली जात असून तिला परत रशियात पाठवण्यासाठी प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. 

हेही वाचा