अध्यक्ष म्हणाले-युवकांनी पुढे यावे, जमिनीत राबावे आणि आपल्या मुळांशी नाते पुन्हा जोडावे.
पणजी : वेळसाव शेतकरी संघटनेने स्तुत्य उपक्रम राबवून गावातील पारंपरिक शेतीचे रुपडे पालटण्यासाठी पुढाकार घेतला आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोक्वेझिन्हो डिसोझा यांनी गावातील युवकांना पुढे येऊन पारंपरिक शेती व्यवसायाला नवे आयाम देण्यासाठी प्रेरित केले. पूर्वी कधीकाळी वापरात असलेल्या पारंपरिक शेतजमिनी ज्या अडगळीत गेल्या होत्या त्या पुन्हा लागवडीखाली आणण्याचा अभिनव उपक्रम वेळसाव गावात सुरू झाला आहे.
संघटनेने गावातील अनेक पडीक शेतजमिनींची मशागत करून नागरणि केली. त्यावर आता खरीफ हंगामात या शेतांत लागवड देखील सुरू करण्यात आली आहे. वेळसाव पंचायतीचे सदस्य जीम डिसोजा यांनी देखील यात सहभाग नोंदवला. लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत, आपल्या जुन्याजाणत्या लोकांनी घेतलेल्या कष्टाची आठवण झाली आणि हे कार्य तडीस नेण्यास प्रेरणा मिळाली असे ते म्हणाले.
गेल्या काही वर्षांत वेळसाव आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतजमिनी अडगळी गेल्या होत्या. आधुनिक जीवनशैली व रोजगाराच्या इतर पर्यायांमुळे तरुणपिढी शेतीपासून दूर गेली. मात्र आता संघटनेने राबवलेल्या या उपक्रमामुळे वेळसावमधील शेतीला गतवैभव पुन्हा प्राप्त होईल असे वेळसाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोक्वेझिन्हो डिसोझा म्हणाले. हा उपक्रम म्हणजे फक्त शेतीला मिळालेले नवजीवन नाही, तर आपल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन आहे. युवकांनी पुढे यावे, जमिनीत राबावे आणि आपल्या मुळांशी नाते पुन्हा जोडावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दरम्यान, हा उपक्रम केवळ शेतीपर्यंत मर्यादित न राहता पर्यावरणसंवर्धन, जलसंधारण आणि स्थानिक रोजगारनिर्मितीचेही आदर्श साधन ठरेल, असा विश्वास गावकऱ्यांना वाटतो आहे.