सरकारकडूनच गोमंतक गौड मराठा समाज, उटावर बंदी; समाजाची प्रमाणपत्रे देण्यातही अडचणी: वेळीप
मडगाव : एसटी समाजासाठी काम करणार्या 'गोमंतक गौड मराठा समाज' व 'उटा' या संघटनांवर सरकारकडूनच बंदी आणण्यात आली. यामुळे समाजाची प्रमाणपत्रे देण्यातही आता अडचणी येणार आहेत. राजकीय आरक्षण, आदिवासी भवन व इतर मागण्या मान्य कराव्यात व त्यानंतर एसटी समाजाशी सामाजिक नाते सांगावे, असे एसटी समाजाचे नेते प्रकाश वेळीप यांनी सांगितले. तसेच हे एकप्रकारचे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांना केला.
'उटा' व 'गोमंतक गौड मराठा समाज' या संघटनांच्या पदाधिकार्यांनी मडगाव येथे पत्रकार परिषद घेत संघटनांवरील बंदीचा परिणाम पूर्ण समाजावर होणार असल्याचे सांगितले. 'उटा' ही संघटना आठ संस्थांनी मिळून नाही तर १४ वैयक्तिक व्यक्तींनी मिळून निर्माण केलेली संस्था आहे. 'युनायटेड ट्रायबल असोसिएशन' ('United Tribal Association' )या नावाने संघटना स्थापन करावयास गेल्यावर या नावाने आधीच संस्था असल्याने 'अलायन्स' हा शब्द त्यात घालून संस्था स्थापन केल्याचे वेळीप यांनी सांगितले. प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर गोविंद गावडे यांनी समाजाचे प्रश्न मांडल्यानंतर त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आल्याचे वेळीप म्हणाले.
त्यानंतर आता कित्येक महिने प्रलंबित खटल्यावर २७ जून व ४ जुलै या दिवशी केवळ आठवड्याभराच्या कालावधीत निकाल देत एसटी समाजासाठी कार्यरत 'गोमंतक गौड मराठा समाज' व 'उटा' या संस्थांवर सरकारने बंदी आणल्याचा दावा प्रकाश वेळीप यांनी केला. 'उटा' ही केवळ गोविंद गावडे यांच्यासाठी काम करणारी संस्था नाही तर ती एसटी समाजासाठी कार्यरत व घटनेने दिलेले हक्क मिळवण्यासाठी स्थापन केलेली संस्था आहे, असे वेळीप यांनी सांगितले.
आधी आरक्षण द्या, नंतरच सामाजिक नाते सांगाः वेळीप
स्वातंत्र्यलढ्यावेळीही फितूर होते तशाच काही फितुरांना घेऊन एसटी समाज संघटना संपवण्याचा प्रयत्न आहे. मात्र तो प्रयत्न आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही. काहीजण एसटी समाजाशी सामाजिक नाते असल्याचे सांगतात असे असल्यास राजकीय आरक्षणाचा मुद्दा, आदिवासी भवन व आदिवासी समाजाच्या इतर १२ मागण्या अजूनही प्रलंबित का आहे, अशी विचारणा वेळीप यांनी केली. एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याचे सांगत भाजपकडून (BJP) पेढे वाटण्यात आले होते. भाजपकडे राज्यात व संसदेतही बहुमत असताना राजकीय आरक्षण विधेयक संमत झाले नाही. त्यामुळे एसटी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे व नंतरच सामाजिक नाते सांगावे, असा पलटवार प्रकाश वेळीप यांनी केला.
आठवडाभरात दोन संस्थांवर कारवाई
१९६३ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या गोमंतक गौड मराठा समाज संस्थेवर बंदी आणण्यात आली. त्यामुळे समाजाची प्रमाणपत्रे देण्यावर निर्बंध आले आहेत. संस्थेचा शिक्का, नाव वापरता येणार नाही, सभा घेता येणार नाहीत असे सांगतानाच प्रशासक नेमण्याचा आदेश दिला आहे. तशीच कारवाई आठवडाभरात 'उटा' संस्थेवर करण्यात आली. समाजाची प्रमाणपत्रे देण्याचा अधिकार हा प्रशासकाला किंवा सरकारलाही नाही व याचा परिणाम पूर्ण समाजावर होणार आहे, असे गोमंतक गौड मराठा समाज संघटनेच्या विश्वास गावडे यांनी सांगितले.
लोकांपर्यंत जात अन्यायाबाबत जागृती करणार
एसटी समाजाच्या विकासासाठी काम करणार्या 'उटा' व 'गोमंतक गौड मराठा समाज' या संस्थांवर घालण्यात आलेली बंदी सरकारने मागे घ्यावी, असे न झाल्यास एसटी समाजावर होत असलेला अन्याय लोकांपर्यंत पोहोचवणार. या निर्बंधांचा समाजावर परिणाम होणार असल्याचे पटवून देणार व त्यानंतरची भूमिका ही लोकांशी चर्चेअंती घेणार, असे प्रकाश वेळीप म्हणाले. आपण भाजपचा सदस्य नसल्याचे सांगतानाच 'अजूनही सरकार एसटी समाजाला राजकीय राजकीय आरक्षण देऊ शकते,' असा विश्वासही वेळीप यांनी व्यक्त केला.