पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने मोठ्या आर्थिक फसवणुकीचा छडा लावत सुमारे २. ४५ कोटींच्या ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी संजय एम. चव्हाण (वय ४५, महाराष्ट्र) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात सासष्टीमधील एका महिलेला शेअर्समध्ये गुंतवणूकीद्वारे मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
नेमके प्रकरण काय ?
सायबर गुन्हे पोलीस स्थानकात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी 'नुवामा वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट' या शेअर ब्रोकरेज संस्थेचे प्रतिनिधी असल्याची बतावणी करून पीडित महिलेला एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील केले. अधिक परताव्याचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण २.४५ कोटी रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले.
दरम्यान सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास गतिमान केला. या आर्थिक फसवणुकीचा तपास करताना एका बँक खात्याचा शोध घेण्यात आला. या खात्यावर एकूण १३.५ लाख रुपये जमा झाले होते. याप्रकरणी संजय एम. चव्हाण (वय ४५, महाराष्ट्र) या व्यक्तीस अटक करण्यात आली असून, त्याच्यावर फसवणुकीत सहभागाचा ठपका ठेवण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९ (२) सह ३(५) आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ड अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हा शाखेचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक पोलीस अधीक्षक अक्षत आयुष यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निरीक्षक ( सायबर गुन्हे ) दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्त्वाखालील उपनिरीक्षक मंदार गांवकर देसाई, कॉन्स्टेबल विराज नार्वेकर आणि अक्षय प्रभू यांच्या पथकाने कारवाई केली. या प्रकरणातील इतर संशयितांचीही चौकशी सुरू असून लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.