२६ रेशन कार्डे सरेंडर : नागरिक पुरवठा खात्याची माहिती
पणजी : गेल्या पाच वर्षांमध्ये गोव्यात रेशन कार्डांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः १५ जून ते ३० जून या कालावधीत तब्बल ३०० हून अधिक नवीन रेशन कार्डांची नोंदणी झाल्याचे नागरिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने जाहीर केले आहे. त्याच काळात २६ रेशन कार्डे सरेंडरही करण्यात आली आहेत.
सध्या राज्यात २.६२ लाखहून अधिक सक्रिय रेशन कार्डे आहेत. यामध्ये १.२४ लाख कार्डे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएफएसए) म्हणजे पीएचएच व एएवाय गटातील आहेत. तर १.३७ लाख कार्डे गरीब रेषेपेक्षा वरील (एपीएल) गटातील आहेत. गेल्या १५ दिवसांत रेशन कार्डांच्या नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. एनएफएसए अंतर्गत २१ नवीन कार्डांची नोंदणी झाली आहे. एपीएल गटात ३०४ नवीन कार्डांची नोंदणी झाली आहे. अशी एकूण ३२५ नवीन रेशन कार्डे तयार करण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील सदस्य वेगवेगळे झाल्यानंतर नवीन कार्डांची मागणी वाढते. तसेच, तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ रेशन न घेतल्यास कार्ड बंद होते. त्यानंतर नागरिक विभागीय कार्यालयात जाऊन कार्ड पुन्हा सुरू करतात.
याशिवाय, उत्पन्न मर्यादा ओलांडल्यामुळे अनेकांनी एनएफएसए कार्डे सरेंडर करून एपीएल कार्डे स्वीकारली आहेत.
सरेंडर कार्डे एनएफएसए गटातील
या १५ दिवसांच्या कालावधीत एकूण २६ कार्डे सरेंडर करण्यात आली. यामध्ये बहुतेक कार्डे एनएफएसए गटातील असून, एकही एपीएल कार्ड सरेंडर झाले नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
उत्तर आणि दक्षिण गोव्यातील आकडेवारी
एनएफएसए गटात :
उत्तर गोव्यात : ७ नवीन कार्डे
दक्षिण गोव्यात : १४ नवीन कार्डे
एपीएल गटात :
उत्तर गोव्यात : १०३ नवीन कार्डे
दक्षिण गोव्यात : २०१ नवीन कार्डे
सरेंडर झालेली एनएफएसए कार्डे (तालुकानिहाय)
तालुका सरेंडर झालेली कार्डे
डिचोली ५
पेडणे २
तिसवाडी १५
फोंडा ४