‘होम स्टे’ योजनेचा राज्यातील ८ स्वयंसाहाय्य गटांनी घेतला लाभ

पर्यटन खात्याने ‘आरडीए’मार्फत राबवली योजना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
23rd June, 12:07 am
‘होम स्टे’ योजनेचा राज्यातील ८ स्वयंसाहाय्य गटांनी घेतला लाभ

पणजी : राज्यातील आठ स्वयंसाहाय्य गटांच्या सदस्यांनी पर्यटन खात्याच्या ‘होम स्टे’ योजनेचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत अनुदान घेऊन त्यांनी आपली जुनी घरे दुरुस्त करून ती पर्यटकांना राहण्यासाठी भाड्याने दिली, अशी माहिती ग्रामविकास खात्यातील सूत्रांनी दिली.
गोविंद गावडे हे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी पर्यटन खात्याबरोबर करार करून आरडीएमार्फत ‘होम स्टे’ योजनेची अंमलबजावणी केली होती. त्यानंतर आरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्वयंसाहाय्य गटांशी संपर्क साधून त्यांना या योजनेची माहिती दिली होती.
आतापर्यंत सात तालुक्यांतील आठ स्वयंसहाय्य गटांच्या सदस्यांनी ‘होम स्टे’ योजनेचा लाभ घेऊन पर्यटन खात्याने दिलेल्या अनुदानातून आपली जुनी घरे दुरुस्त करून सुविधा उभारल्या आणि आपल्या घरातील एक खोली त्यांनी पर्यटकांना राहण्यासाठी भाड्याने दिली. तसेच पर्यटकांना राहण्याच्या सुविधेबरोबर त्यांना आपल्या घरातच चहा आणि जेवणाची सोय स्वयंसहाय्य गटांचे सदस्य करत आहेत. या योजनेद्वारे त्यांना उत्पन्नाचे एक साधन तयार झाले आहे, अशी माहिती ‘आरडीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
डिचोली, पेडणे, फोंडा, सत्तरी, धारबांदोडा, सांगे आणि केपे या सात तालुक्यांतील ग्रामीण भागांचा समावेश ‘होम स्टे’ योजने अंतर्गत झाला आहे. पण, कळंगुट भागात एका स्वयंसहाय्य गटाच्या सदस्याचे घर आम्ही एअर बीएनबी या खासगी कंपनीमार्फत दुरुस्त करून आम्ही ते पर्यटकांना राहण्यासाठी दिले आहे, असे त्या अधिकाऱ्याने सांगितले. फक्त पर्यटन खातेच नव्हे, इतर खात्यांच्याही योजना आहेत, त्या योजना स्वयंसहाय्य गटांपर्यंत पोहचून त्यांना उत्पन्नाचे साधन तयार व्हावे म्हणून आरडीएने इतर खात्यांबरोबर करार केले आहेत.

‘होम स्टे’ योजनेचा उद्देश
- आपले स्वतःचे घर पर्यटकांना राहण्यास देण्यासाठी पर्यटन खात्याने होम स्टे योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी गोवा पर्यटन व्यवसाय नोंदणी कायद्याखाली नोंदणी करावी.
- लाभार्थी हा आपल्या घराचा मालक असणे गरजेचे आहे. या योजनेखाली कमीत कमी दोन खोल्या आणि जास्तीत जास्त सहा खोल्या भाड्याने द्यायला मिळतात.
- ‘होम स्टे’ क्षेत्र नियंत्रित करण्याबरोबर स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ करणे, संस्कृतीची अदला-बदली करणे, खऱ्या गोव्याच्या आदारातिथ्याचा पर्यटकांना अनुभव देणे आणि परवडणारा दर देणे हा या योजनेचा उद्देश आहे.                               

हेही वाचा