मराठी राजभाषेची मागणी हा राष्ट्रीयतेचा प्रश्न : वेलिंगकर

दवर्लीत मराठी राजभाषा निर्धार मेळावा : जो पक्ष मराठीला पाठिंबा देईल, त्यालाच मतदान करण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 11:58 pm
मराठी राजभाषेची मागणी हा राष्ट्रीयतेचा प्रश्न : वेलिंगकर

मडगाव : मराठी ही केवळ भाषा नसून गोव्याची ओळख, परंपरा आणि राष्ट्रीयतेचा आत्मा आहे. गोव्याची संस्कृती ही संतांची शिकवण, शिवछत्रपतींचा विचार आणि मराठी भाषेच्या पायावर उभी आहे. त्यामुळे मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा देणे ही केवळ भाषिक मागणी नाही, तर राष्ट्रीयतेचा मुद्दा आहे, असे ठाम मत सुभाष वेलिंगकर यांनी दवर्ली येथील श्री दुर्गादेवी मंदिर सभागृहात झालेल्या ‘मराठी राजभाषा निर्धार मेळाव्यात व्यक्त केले.

या मेळाव्याला वेलिंगकर यांच्यासह गो. रा. ढवळीकर, विविध मराठीप्रेमी संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेलिंगकर म्हणाले, गोवा स्वतंत्र होऊन दशकांहून अधिक काळ लोटला, तरी काहींच्या मनातून पोर्तुगालप्रेम संपलेले नाही. उलट काही लोकांनी युनोमध्ये ऑनलाइन याचिका सादर करत 'स्वतंत्र राष्ट्र' मागण्याचे धाडस केले, हे देशद्रोह आहे. अजूनही त्यांच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंदवला गेलेला नाही, हे दुर्दैव आहे. 

रोमी लिपीची मागणी परधार्जिणी मानसिकता

रोमी लिपीविषयी बोलताना वेलिंगकर म्हणाले, रोमी लिपी ही भाषा नाही, ती पोर्तुगीजांनी धर्मांतरित लोकांसाठी सोईची म्हणून वापरलेली लिपी होती. आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. कोकणी आणि मराठी भाषेची स्वतःची देवनागरी लिपी असताना परकी लिपीला स्थान देणे, हे भाषेच्या आत्मघातासारखे आहे. त्यामुळे अशा मागण्यांना विरोध करणे ही वेळेची गरज आहे. वेलिंगकर यांनी स्पष्ट केले की, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी जी राजकीय ताकद पाठिंबा दर्शवेल, तिलाच मराठी भाषिकांनी मतदान करावे. युवकांमध्ये जागृती निर्माण करून मतपेढी तयार केल्यास सरकारवर दबाव आणता येईल.

कार्यक्रमाचा उद्देश मराठी भाषिक समाजात जागरूकता निर्माण करणे, युवकांमध्ये भाषाविषयी अभिमान निर्माण करणे, तसेच आगामी काळात राज्य सरकारवर ठोस दबाव निर्माण करून मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवून देणे हा होता. यासाठी भविष्यात अधिक व्यापक मेळावे आणि चळवळी होणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

मराठी ही संतांची, समाजाला दिशा देणारी भाषा

मराठी ही समृद्ध भाषा असून संतांनीही या भाषेचा वापर समाजाला नवी दिशा देण्यासाठी केला, ही संतांची भाषा आहे. कोकणी ही केवळ बोलीभाषा आहे. काही लोकांमुळे तिला राजभाषेचा मान मिळाला. मराठी राजभाषा करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून, या चळवळीला पाठिंबा देण्याचे आवाहन गो. रा. ढवळीकर यांनी केले.


हेही वाचा