३ हजार रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी रद्द

तांत्रिक त्रुटींमुळे उत्तर, दक्षिण गोव्यातील हजारो लाभार्थ्यांवर परिणाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd June, 11:49 pm
३ हजार रेशन लाभार्थ्यांची ई-केवायसी रद्द

पणजी : राज्यात रेशन कार्डधारकांसाठी सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींमुळे ३,७८९ लाभार्थ्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याने दिली आहे. एकूण ६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असताना, या तांत्रिक त्रुटींमुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.      

राज्यातील ९.७४ लाख रेशन कार्ड लाभार्थ्यांपैकी आतापर्यंत ६ लाखांहून अधिक जणांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत (एनएफएसए) येणाऱ्या अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच ) रेशन कार्ड लाभार्थ्यांपैकी ७३.६१ टक्के आणि दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) ५३.५८ टक्के लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, या ६ लाख यशस्वी लाभार्थ्यांपैकी ३,७८९ जणांनी सोसायटीमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती. असे असूनही, तांत्रिक त्रुटींमुळे त्यांची केवायसी पोर्टलवर गृहीत धरण्यात आली नाही, ज्यामुळे त्यांची मंजुरी अर्धवट राहिली आणि त्यांचे अर्ज बाद करण्यात आले.      

नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोसायटीमध्ये प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे सर्व तपशील पडताळणीसाठी केंद्राच्या पोर्टलवर जातात. चाचणीदरम्यान, लाभार्थ्यांच्या आधार कार्डच्या तपशीलांमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच, त्यांचा आधार क्रमांक आणि बोटांचे ठसे जुळवण्यात अडचणी आल्याने त्यांचे ई-केवायसी वगळण्यात आले.      

नागरी पुरवठा खाते या अडचणींचा आढावा घेत असून, अशा तांत्रिक अडथळ्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या अर्जदारांना पुन्हा एकदा ई-केवायसी प्रक्रिया करण्याची संधी देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.

हजारांहून अधिक रेशनकार्ड लाभार्थींना वगळले

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (एनएफएसए) अंतर्गत २,३०३ लाभार्थ्यांना ई-केवायसीमधून वगळण्यात आले आहे. यापैकी उत्तर गोव्यात १,२७८ आणि दक्षिण गोव्यात १,०२५ जणांना वगळण्यात आले आहे. तर दारिद्र्यरेषेवरील १,८४६ रेशनकार्ड लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. यापैकी उत्तर गोव्यात ८९१ आणि दक्षिण गोव्यात ९५५ जणांना वगळण्यात आले आहे. 

हेही वाचा