एकत्रिकरणाचे शिवसेना, राष्ट्रवादीचे खटाटोप

२०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश नंतरच्या विधानसभा निवडणूक निकालांनी झाकोळले गेले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे, अशा वेळी उद्धव आणि राज यांच्या एकत्रित येण्याचा गरजेवर भर दिला जात आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

Story: संपादकीय |
22nd June, 11:18 pm
एकत्रिकरणाचे शिवसेना, राष्ट्रवादीचे खटाटोप

सध्या महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन्ही गट अर्थात ठाकरे आणि शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट यांचे एकत्रिकरणाचे जे खटाटोप चालले आहेत, ते व्यर्थ जातील असे दिसू लागले असून प्रत्यक्षात त्या गटांचे विघटन सुरू आहे. अजित व शरद गट यांनी स्वतंत्रपणे २६ वा स्थापना दिवस कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे पुनर्मिलनाबाबतची चर्चा निष्फळ ठरल्याचे स्पष्ट होत आहे. पुन्हा एकत्र येण्याचा पर्याय बंद झाल्याचा निष्कर्ष यावरून काढला जात आहे. महापालिका अथवा पालिका निवडणुकीत स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी प्रत्येक गट करीत असल्याचे दिसते आहे. याचप्रमाणे शिवसेनेतील ठाकरे व शिंदे हे गट स्वतंत्रपणे एकमेकांविरुद्ध राजकीय खेळी खेळत असल्याचे दिसून येते. काही तरुण नेत्यांना एकत्रिकरणाचे वेध लागले असले तरी आपले पक्ष पुन्हा एक होतील, असा आशावाद तेही व्यक्त करीत असल्याचे दिसत नाही. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत कायदेशीर लढाया सर्वोच्च न्यायालयात अजूनही सुरू आहेत. सध्याच्या घडीला शिवसेना व राष्ट्रवादीचे गट पुन्हा मूळ पक्षात एकत्र येतील, याची शक्यता सध्यातरी नगण्य दिसते. दोन्ही बाजूंनी त्यांच्या भौतिक ताकदीसाठी स्वतंत्र तयारी जोरात सुरू आहे, असे चित्र निर्माण झाले आहे. निवडणूक आयोग अथवा / न्यायालयात पक्ष-चिन्हावर सुनावणी पूर्ण होऊन लागणारा निर्णय दोन्ही गटांच्या भवितव्यावर परिणाम करणारा असेल. पुढच्या काही महिन्यांत सर्व पक्ष फक्त निवडणुकांच्या तयारीला लागल्यावर कदाचित मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी तात्पुरत्या तडजोडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण सध्या तरी तशी कोणतीही शक्यता दिसत नाही.

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांना आपले पुत्र उद्धव आणि पुतणे राज यांच्या क्षमतेची जाणीव होती, त्यांच्यामधील त्रुटीही त्यांना ठाऊक असाव्यात, त्यामुळे पक्ष कार्यकर्ते आणि संघटना यांच्याशी सतत संपर्क ठेवणारे उद्धव आणि चांगले वक्तृत्व लाभलेले पण संघटक म्हणून यशस्वी न ठरलेले राज यांच्यात त्यांना निवड करायची होती. मुलाची निवड केली, या टीकेची पर्वा न करता त्यांनी उद्धव यांना प्राधान्य दिले. उद्धव ठाकरे यांनी सत्ताप्राप्तीपर्यंत पक्ष पुढे नेला तर फुटलेले मनसे नेते राज यांना अल्प यश प्राप्त झाल्याने बाळासाहेबांचा निर्णय योग्य होता, अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली होती. मुंबई महापालिकेची सत्ता मिळवून उद्धव ठाकरे यांनी पक्षावरील आपले नियंत्रण सिद्ध केल्याचे दिसून आले. असे असतानाही मुख्यमंत्रिपदासाठी बाळासाहेबांनी मनोहर जोशी आणि नंतर नारायण राणे यांना संधी देऊन उद्धव यांची प्रशासकीय कामातील कमजोरी मान्य केली, असे म्हटले गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना का डावलले गेले यावर बरीच चर्चा प्रसार माध्यमात रंगली होती. २०१४ साली भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या म्हणून मुख्यमंत्रिपद त्या पक्षाला देण्याबाबत कोणतीही कुरबूर न करणारी शिवसेना भाजपशी युती असून आणि तेच चित्र पुन्हा निर्माण झाले असतानाही, केवळ मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीशी हातमिळवणी करते, हे चित्र जनतेला विचित्र दिसले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश नंतरच्या विधानसभा निवडणूक निकालांनी झाकोळले गेले आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आहे, अशा वेळी उद्धव आणि राज यांच्या एकत्रित येण्याचा गरजेवर भर दिला जात आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गट असोत किंवा शिवसेनेचे एकत्रिकरण असो, महत्त्वाचा मुद्दा हा राजकीय भूमिकेसंबंधात आहे. भाजपशी संबंध तोडले जात असतील तर अजित पवार यांनी आपल्या गटासह पक्षात परत यावे, असे शरद पवार म्हणत आहेत. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी संपर्क न ठेवता एकत्रिकरणाला प्राधान्य द्यावे अशी भावना मनसेचे काही नेते व्यक्त करीत आहेत. सहकार्यासाठी भाजपनेही अशीच अट घातली असल्याचे मानले जाते. सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करीत अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत जातात का, राज यांना कोणते पद देऊन उद्धव ठाकरे त्यांचे समाधान करू शकतील, असे काही अवघड प्रश्न सुटल्याशिवाय कोणत्याही पक्षात एकत्रिकरणाची शक्यता नाही, हेच खरे.