पणजी : क्रिप्टोकरन्सी आणि इतर गुंतवणूक योजनेत जादा परताव्याचे आमिष दाखवत कुडचडे येथील एका कुटुंबाची तब्बल ४.८२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात संशयित सुकांता भौमिक याला गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.
या प्रकरणात कुडचडे येथील रुपेश रोहीदास बांदेकर यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOC) तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, सुकांता भौमिक आणि अजय दोडामणी यांनी गोवा गेम्स ऑनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या प्रतिनिधी या नात्याने गुंतवणुकीसाठी दबाव टाकला होता. १५ जुलै २०१७ ते १० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांनी कंपनीत वेळोवेळी आर्थिक गुंतवणूक केली. सुरुवातीला काही परतावा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला.
यानंतर तक्रारदाराने cryptocoinshopping.com या संकेतस्थळावरून ५.७५५८३२७ बिटकॉइन्सची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर कोणताही मोबदला मिळाला नाही. त्यांची फसवणूक झाली. सध्याच्या बाजारभावानुसार या गुंतवणुकीचे मूल्य ४.६ कोटींहून अधिक असून एकूण फसवणुकीची रक्कम ४.८२ कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.
या तक्रारीनंतर ईओसीने गुन्हा दाखल करून दोन्ही संशयितांना अटक केली होती. त्यापैकी अजय दोडामणी याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, सुकांता भौमिक याचा जामीन अर्ज न्यायालयाने नाकारला होता. त्यानंतर भौमिकने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जामिनासाठी अर्ज दाखल केला. सुनावणीदरम्यान न्यायालयाने भौमिकला एक लाख रुपयांच्या वैयक्तिक हमीसह, पासपोर्ट ईओसी कार्यालयात जमा करणे, तपास अधिकाऱ्यांच्या समोर नियमित हजेरी लावणे यासारख्या अटींसह जामीन मंजूर केला.
दरम्यान, ईओसीने या प्रकरणाचा तपास पूर्ण करून २४ साक्षीदारांच्या जबाबांसह १,०६४ पानी आरोपपत्र मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २७ मे रोजी होणार आहे.