बार्देश : सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर, सागर पाटीलसह चौघे पर्वरी पोलिसांच्या ताब्यात!

पळून जाण्याच्या तयारीत असताना पेडणे-पर्वरी पोलिसांची धडक कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd June, 04:59 pm
बार्देश : सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर, सागर पाटीलसह चौघे पर्वरी पोलिसांच्या ताब्यात!

पणजी : अनेक दिवसांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार टारझन पार्सेकर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पर्वरी पोलिसांनी पेडणे पोलिसांच्या मदतीने ही धडक कारवाई केली. त्याच्यासोबत सागर पाटील तसेच इतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.  

नेमके प्रकरण काय ?  

एका बांधकाम व्यावसायिकाला सुरुवातीला १ लाख प्रति महिना खंडणीसाठी टारझन आणि त्याच्या साथीदारांनी धमकावले. व्यावसायिक आपल्याला बधत नाही ही गोष्ट लक्षात येताच टारझन याने पुन्हा ५ लाख प्रति महिना खंडणीची मागणी करून त्याला धमकावले.  दरम्यान सदर व्यवसायिकाने पर्वरी पोलिसांत याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान टारझन आपल्या साथीदारांसह पेडण्यात असल्याची माहिती पर्वरी पोलिसांना मिळाली.  पर्वरी पोलिसांनी अधिक माहिती मिळवण्याच्या दृष्टीने पेडणे पोलिसांशी संपर्क साधला. 

पेडणेचे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी पथकाची स्थापना करून टारझनचा मागोवा काढला. टारझन पेडण्यातील नानेरवाडा येथे असल्याचे स्पष्ट झाले. यांची माहिती पर्वरी पोलिसांना दिल्यानंतर तेथील पोलीस कर्मचारी नानेरवाडा येथे हजर झाले. पोलीस आल्याचा सुगावा लागताच टारझन आणि त्याच्या साथीदारांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.  यावेळी पोलीस आणि चारही गुन्हेगारांत हाणामारी झाली. अखेरीस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. 

...टारझन फरार झाला होता!

 गुरुवार, ४ जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नागवा येथील फुटसाल मैदानाजवळ त्याने एका व्यक्तीला आणि नऊ वर्षाच्या मुलाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी संबंधित व्यक्तीने हणजूण पोलिसांत तक्रार नोंदवली होती. ती व्यक्ती रवी शिरोडकर यांचा मित्र आहे.  १ ऑक्टोबर २०२२ रोजी नागवा येथे टारझन पार्सेकर टोळीकडून रवी शिरोडकरवर प्राणघातक हल्ला झाला होता. 

या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने संशयित टारझन याला उत्तर गोव्यात प्रवेश करण्यास मनाई करीत सशर्त जामिनावर सुटका केली होती. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यामुळे संशयिताचा जामीन रद्द करण्याची मागणी हणजूण पोलिसांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. तसेच १७ मार्चपर्यंत न्यायालयाला शरण येण्याचा आदेशही जारी केला. पण तो न्यायालयात शरण न येता फरार झाला होता. 

दरम्यान पेडणे पोलिसांनी त्याला आणि सागर पाटील तसेच इतर दोघांना पर्वरी पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. पर्वरी पोलीस खंडणी प्रकरणाची चौकशी करताहेत. 


  • बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा