तुरुंगातून सुटलेल्या साथीदाराला न्यायला आला असताना अडकला जाळ्यात
म्हापसा : पर्वरी परिसरातील दुचाकी चोरी प्रकरणातील टोळीतील भुवन तिलकराजे पिल्ले (वय १९, रा. पेडे, म्हापसा) याला पोलिसांनी अटक केली आहे. पाच महिन्यांनंतर कारागृहातून सुटलेल्या आपल्या साथीदाराला न्यायला तो कारागृहाबाहेर आला होता. याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तब्बल सहा महिन्यांपासून फरार असलेला भुवन अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
दि. १९ जानेवारी २०२५ रोजी उत्तररात्री १.१० वा. च्या सुमारास पर्वरीतील पीडीए कॉलनीमधील व्हील प्लेनेट शोरूमसमोर पार्क केलेली फिर्यादी सौरभ देसाई यांची जीए ०४ पी ५१०० क्रमांकाची दीड लाखांची बुलेट चोरीस गेली होती.
याप्रकरणी पोलिसांनी २९ जानेवारी रोजी खानापूर-बेळगाव मधून संशयित ललित वायंगणकर (१९, रा. कोलवाळ) याच्यासह एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाला अटक करीत बुलेटसह चोरीच्या चार दुचाकी जप्त केल्या होत्या. तर, या टोळीतील भुवन पिल्ले व हेमराज हे दोघे संशयित फरार झाले होते. पोलिसांनी जप्त केलेल्या इतर दुचाकी या ग्रीन पार्क जंक्शन गिरी म्हापसा, अस्नोडा व सावंतवाडीतून चोरीस गेल्या होत्या.
याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर म्हापसा न्यायालयात संशयित ललित वायंगणकरविरुद्ध खटला सुरू झाला. संशयिताने गुन्हा कबुल केला. त्याच्याविरुद्ध हा एकच गुन्हा नोंद आहे. त्याने पाच महिने कैद भोगल्यामुळे न्यायालयाने त्याची शुक्रवार, २० जून रोजी आरोप निश्चित करीत सुटका केली.
ललित हा कारागृहातून सुटल्यानंतर भुवन पिल्ले त्याला न्यायला आला. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ते दोघेही कळंगुटमध्ये गेले व एका गेस्ट हाऊसमध्ये उतरले. याची माहिती पर्वरी पाेलिसांना मिळाली असता कळंगुट पोलिसांच्या मदतीने दोघांनाही शुक्रवारी रात्रीच पकडण्यात आले. ललित याला याप्रकरणात आधीच अटक झाल्यामुळे त्याला पोलिसांनी सोडून दिले तर भुवन पिल्लेला अटक केली.
मयडे पुलावरील श्री रवळनाथ मंदिर फोडीमध्ये संशयित भुवन व हेमराज यांचाच समावेश होता, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
टोळीतील हेमराज अद्याप फरार
या टोळीतील हेमराज हा अद्याप फरार आहे. गोव्यात तसेच सावंतवाडीमध्ये चोर्या करून थेट बेळगाव व खानापूर गाठून तिथे संशयित लपायचे. शिवाय संशयितांनी बेळगावमधील काही दुकानेही फोडलेली असून तिथे त्यांच्यावर गुन्हे नोंद आहेत. हेमराज हा गोरेगाव मुंबई येथे दुचाकी मॅकेनिक म्हणून काम करत होता. त्यामुळे चावी केलेल्या दुचाकी तो सहजपणे चोरायचा. भुवन व ललितची हेमराजशी ओळख बेळगावमध्येच झाली होती.