साहित्य अकादमीचे मानकरी नयना आडारकर आणि ग्लिनिस डायस

साहित्यविश्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराने यंदा गोव्याचे नाव उंचावले आहे. लेखिका नयना आडारकर आणि लेखिका ग्लिनिस डायस यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांच्या या यशाने साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल आणि त्यांच्या साहित्य प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद…

Story: विशेष मुलाखत |
21st June, 11:13 pm
साहित्य अकादमीचे मानकरी  नयना आडारकर आणि ग्लिनिस डायस

बहुमान बालसाहित्याचा 

शक्त आसली म्हूण

कोण व्हड जायना

ते शक्तीक जो मेरेन

बऱ्या कामाक लायना

आपल्या कवितेतून जीवनाप्रतीचा बोध देणाऱ्या नयनाताई आडारकर, लहान मुलांच्या बालविश्वात सफर करत साहित्यविश्वात मानाचा समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार २०२५ च्या मानकरी ठरल्या आहेत. गोव्याच्या साहित्य परंपरेत मानाचा तुरा खोवणारे नाव ठरलेल्या नयना आडारकर यांना त्यांच्या 'बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो' या पुस्तकासाठी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या पुरस्काराबद्दल आणि साहित्यिक प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी खास संवाद साधला.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया विचारताच नयनाताईंच्या बोलण्यातून समाधान उमटले. त्या म्हणाल्या, "माझ्यासाठी हा पुरस्कार अनपेक्षित सुखद धक्का होता. पण तो सुखद असल्याने फार बरे वाटले." त्यांच्या लेखणीतून नेहमीच वाचकांना आनंद देणाऱ्या नयनाताईंना मिळालेला हा सन्मान त्यांच्यासाठीही तितकाच आनंदाचा क्षण होता.

नयनाताईंनी त्यांच्या पुरस्कार विजेत्या पुस्तकाची, 'बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो' ची कल्पना कशी सुचली हे सांगितले. त्या म्हणाल्या, "बालपणात माझ्याकडून तसेच इतरांकडून घडलेल्या काही मनोरंजक घटना मी माझ्या मुलांना रंगवून सांगत असे. मुलांना त्या ऐकायला फार आवडायच्या. हा प्रयोग मी माझ्या समवयस्क लोकांबरोबरही केला, तेव्हा मला जाणवलं की, ह्या गोष्टींत त्यांना 'थ्रिल' अनुभवायला मिळते. त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यातल्या निवडक घटना घेऊन ह्या पुस्तकांतली एक गोष्ट घडली. दुसऱ्या इतर गोष्टी ह्या हल्लीच्या काळात किशोर वयातील मुलांना अनुभवास येणाऱ्या कित्येक प्रसंगांची सांगड घालून तयार केल्या आहेत."

बालसाहित्यातील योगदान आणि कवितेची ओढ नयनाताईंनी कोंकणी साहित्य आणि विशेषतः बालसाहित्यात मोठे योगदान दिले आहे. बालसाहित्य लिहिण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली, यावर त्यांनी प्रकाश टाकला. "आजीकडून गोष्टी ऐकणे आणि त्या हावभावासहित सादर करणे ही माझी बालपणापासूनची आवड. लिहिती झाल्यावर ‘भुरग्यांचो राजहंस’ साठी काही गोष्टी लिहिल्या. नंतर ‘हरिप्रकाशन’ ह्या संस्थेने माझी लागोपाठ नऊ पुस्तके प्रसिद्ध करून माझ्यासाठी बालसाहित्याचे दालन उघडले." पुढे त्या सांगतात, गोव्यातल्या एका कोंकणी दैनिकात असताना मुलांसाठी सातत्याने लिहिणे आणि देशी-विदेशी साहित्याचे अनुवाद केले गेले. कोंकणी भाषा मंडळाच्या वतीने मुलांसाठी शैक्षणिक साहित्य, गीतलेखन हातून घडले. राजहंस प्रकाशनातर्फेही पुस्तके प्रसिद्ध झाली. सगळी मिळून ३३ बालसाहित्याची पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत." हे त्यांच्या बालसाहित्यातील अफाट योगदानाचे द्योतक आहे.

बालपणीची कोणती गोष्ट किंवा पुस्तक आवडलं होतं आणि त्याचा त्यांच्या लेखनावर परिणाम झाला का, असे विचारले असता त्या आठवणीत रमल्या. "अभ्यासाव्यतिरिक्त माझे वाचनातले पहिले पुस्तक मला बाबांनी भेट दिले. 'शेंवतीचे फूल'. ते पुस्तक त्याच्या कव्हरसहित माझ्या लक्षात राहिले आहे. चांदोबा व इतर गोष्टींची पुस्तके, तसेच आई, आजीने सांगितलेल्या गोष्टी, मी मुलांना सांगितलेल्या गोष्टींनी मला लिहिण्यास प्रवृत्त केले." कविता, कथा, ललित निबंध, नाटक आणि बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये लेखन करणाऱ्या नयनाताईंना कोणता प्रकार सर्वात जवळचा वाटतो, या प्रश्नावर त्या लगेच म्हणाल्या, "कविता. त्या माझ्या सगळ्या भावभावनांशी निगडित आहेत. बाकी साहित्यप्रकार लिहिण्यासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. पण कविता काम करता करता आली तर छोट्याशा कागदावर तिला उतरवून घेण्यास सोपे पडते." याचबरोबर, बालसाहित्य निर्मिती ही सर्वात कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोंकणी बालसाहित्याचे 

भविष्य आणि वाचकांना संदेश

कोंकणी बालसाहित्याच्या वर्तमान आणि भविष्याकडे त्या कशा पाहतात, यावर त्यांनी आशावादी दृष्टिकोन व्यक्त केला. "पूर्वी पारंपरिक पद्धतीने बालसाहित्य लिहिले जायचे. गोष्टींच्या शेवटी 'मोरल ऑफ द स्टोरी' यायची. आता कोंकणी बालसाहित्याने नवीन वळण घेतले आहे. बालवाचकांची वयमर्यादा, त्यांची समज, त्यांचे विचार, त्यांना भेडसावणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्यांचा विचार करून साहित्यनिर्मिती करणे काळानुसार किती गरजेचे आहे, याचे प्रशिक्षण कोंकणी भाषा मंडळाने राष्ट्रीय पातळीवर कार्यशाळा घेऊन लेखकांना दिले आहे. कोंकणी बालसाहित्याचे भविष्य मला तरी उज्ज्वल दिसते."

साहित्य अकादमी पुरस्कारामुळे पुढील लेखन प्रवासात काही बदल होतील का, यावर नयनाताईंचा विचार स्पष्ट आहे. "साहित्यात बदल घडवण्यासाठी पुरस्काराची गरज नसते. पुरस्कार एक कौतुकाची थाप तुमच्या कार्याला. लेखकाने सदैव जागृत राहावे. समाज, माणसे आणि इतर गोष्टींचे भान ठेवावे आणि सातत्य राखावे हे साहित्यिकाचे कार्य. त्याने हे कार्य प्रामाणिकपणे केले पाहिजे."

शेवटी, त्यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल आपल्या वाचकांना आणि हितचिंतकांना काही संदेश देऊ इच्छिता का, असे विचारले असता, त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. "वाचनाने अनेकांना समृद्ध केले आहे. स्वतःमधला आत्मविश्वास जागवायचे काम केले आहे. मी माझ्या हितचिंतकांची, वाचकांची ऋणी आहे. तीच माझी प्रेरणास्थाने. त्यांनी अशीच प्रेरणा देत राहावे, अशी नम्र विनंती."

नयना आडारकर यांच्या या यशाने कोंकणी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे आणि त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!

गोव्याचं गावपण सांगणारी ‘गांवगाथा’
यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने गोव्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. लेखक ग्लिनिस डायस यांना त्यांच्या 'गांवगाथा' या कथासंग्रहासाठी प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण जीवनाचे मार्मिक चित्रण करणारा हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यांच्या या यशाबद्दल आणि साहित्यिक प्रवासाविषयी जाणून घेण्यासाठी ग्लिनिस डायस यांच्याशी खास संवाद साधला.

'गांवगाथा' या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा कसे वाटले आणि या पुरस्काराचे महत्त्व काय आहे, असे विचारले असता ग्लिनिस डायस यांनी आपला आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, "साहित्य क्षेत्रातील हा माझा पहिलाच पुरस्कार असल्याने मला खूप आनंद झाला. वाडें कुर्डीसारख्या ग्रामीण भागातील असूनही हा पुरस्कार मला मिळाला, ही माझ्यासाठी खरोखरच आनंदाची गोष्ट आहे." हा पुरस्कार त्यांच्यासाठी केवळ एक सन्मान नसून, त्यांच्या ग्रामीण मुळांशी जोडलेली एक अनमोल आठवण आहे.
'गांवगाथा' ची कल्पना कशी सुचली आणि या कथासंग्रहामागील प्रेरणा काय होती, यावर बोलताना डायस यांनी सांगितले, "या संग्रहातील प्रत्येक कथा कुठेतरी माझ्या गावाशी संबंधित आहे. म्हणजेच पात्रे, विषय, भाषा. या लोकांच्या या सर्व कथा. म्हणूनच मला वाटले की मी या पुस्तकांना 'गांवगाथा' असे नाव द्यावे." त्यांच्या गावानेच त्यांना या कथासंग्रहासाठी प्रेरणा दिली हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.
ग्लिनिस डायस यांनी लिहायला कशी सुरुवात केली आणि लेखनात रस कधी निर्माण झाला, यावर प्रकाश टाकला असता त्या म्हणाल्या, "गोवा विद्यापीठात कोंकणीतून एम. ए. करत असतानाच्या काळात मी कथा आणि निबंध लिहायला सुरुवात केली. पण मी माझे लेखन कुठेही प्रकाशित केले नाही कारण मला त्यावर आणखी संस्कार करायचे होते. मी कॉलेजमध्ये असताना फक्त माझ्या अभ्यासक्रमासाठी वाचत असे. एम.ए. करताना मी वसतिगृहात राहत होते. तिथे मला वाचनासाठी खूप वेळ मिळत असे. गेल्या दोन वर्षांत मी खूप वाचन केले आहे. तेव्हापासून मला लेखनाची आवड निर्माण झाली."
साळावली धरणाच्या बांधकामामुळे बुडालेल्या कुर्डी गावावर आधारित त्यांची शीर्षक कथा खूप मार्मिक आहे. ही कथा लिहिताना त्यांच्या भावना काय होत्या, हे विचारले असता त्या भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, " वर्षातून फक्त दोन महिनेच कुर्डी परिसरात जाता येते. दरवर्षी जेव्हा आम्ही सर्व गावकरी, कुटुंब एकत्र जेवायला किंवा फिरायला जायचो, तेव्हा या भागात पाऊल ठेवले की लगेचच आमच्यातली मोठी माणसं आम्हा सर्व मुलांना सांगू लागत की, हे इथे आहे, ते तिथे आहे. त्यांना इतके भावनिक होताना पाहून माझ्याही डोळ्यात पाणी यायचे. आणि याच भावनेत मला या कथांची बीजं सापडली."
कोंकणी भाषेच्या सहाय्यक प्राध्यापक म्हणून, नवोदित कोकणी लेखकांना आपण कोणता सल्ला द्याल असा प्रश्न विचारल्यावर ग्लिनिस डायस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, " कोंकणी साहित्यात आजपर्यंत जे विषय आले नाहीत त्यावर लिहा. अजूनही न दिसणाऱ्या प्रदेशाच्या समस्या आणि त्या त्या प्रदेशाची वैशिष्ट्ये याबद्दल लिहायला हवे. जर आपली भाषा आणि संस्कृती साहित्यातून व्यक्त झाली तरच आपला प्रदेश लोकांपर्यंत पोहोचेल असा माझा विश्वास आहे."
आपल्या यशाचे श्रेय कोणाला द्याल, या प्रश्नावर डायस अत्यंत भावुक झाल्या. "सर्वप्रथम, मी माझ्या वडिलांना माझ्या यशाचे श्रेय देऊ इच्छिते. मी हे पुस्तक त्यांना समर्पित करते आणि योगायोगाने, १८ जून रोजी, माझ्या वडिलांच्या १७ व्या पुण्यतिथीच्या दिवशीच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. दुसरे म्हणजे, या कथा संग्रह स्वरूपात प्रकाशित होईपर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मदत केली आणि मार्गदर्शन केले अशा अनेकांना मी श्रेय देते."
शेवटी, आपल्या वाचकांना आणि साहित्यप्रेमींना कोणता संदेश देऊ इच्छिता, हे विचारले असता त्यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. "शक्य तितके वाचा. वाचताना तुम्हाला कोणत्याही नवीन लेखकाचे लेखन आवडले तर त्याला लगेच प्रोत्साहन द्या."
ग्लिनिस डायस यांच्या या यशाने कोंकणी साहित्य अधिक समृद्ध झाले आहे असेच म्हणावे लागेल. त्यांच्या पुढील लेखनासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा!


- स्नेहा सुतार