श्री क्षेत्र तपोभूमी संस्थापक, ब्रह्मानंदाचार्य स्वामी तथा विद्यमान पीठाधीश्वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनाने श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाच्या माध्यमातून अखंडितपणे सुरू असलेल्या योग कार्याचा इतिहास जागतिक योग दिनानिमित्ताने...
विश्वस्तरावर २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगशास्त्र म्हणजे भारतीय ऋषिमुनींनी विश्वाला बहाल केलेली एक महान देणगी आहे. योग क्षेत्रात गोव्याचा जर आपण इतिहास पाहिला तर गोवा राज्यात योगशास्त्राचे ज्ञान समस्त जनता जनार्दनाला प्राप्त व्हावे या हेतूने ब्रह्मानंदाचार्य स्वामींनी श्री ब्रह्मानंद योग अनुसंधान केंद्र ही पहिली योग क्षेत्रातील संस्था १९९८ साली श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर सुरू केली.
हजारोंच्या संख्येने योग शिक्षक तयार करून ग्रामपातळीवर योग प्रशिक्षण वर्ग सुरू केले व समाजाला योग विद्या प्रदान करण्याचे महान कार्य पूज्य स्वामींनी करून गोव्यात योगक्रांती घडविली. योग विषयातून अनुशासनाचे ध्येय साध्य करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी, सामुदायिक पातळीवर, साप्ताहिक योग वर्ग आदी माध्यमातून योगासन प्रशिक्षण देण्यात आले. आज हेच ऐतिहासिक कार्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामींच्या मार्गदर्शनाखाली सद्गुरू योग गुरुकुलच्या माध्यमातून राज्यासह राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. योग क्षेत्रातील विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॉफरन्सच्या माध्यमातून पूज्य स्वामीजी गोवा तसेच भारताचेही नेतृत्व करत आहे. पोर्तुगाल, स्विझर्लंड, रोम-इटली, जर्मनी, दुबई, लंडन, अमेरिका अशा देशांमध्ये योग शास्त्रावर आधारित कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, प्रणवयोग आदी विषयांवर केलेले संबोधन प्रेरणादायी ठरत आहेत. अखिल गोवा योगासन स्पर्धा, राष्ट्रीय योग चॅम्पियनशीप, गोवा योग महोत्सव, वर्ल्ड योग फेस्टिव्हल आदी विशाल स्वरूपातील कार्यक्रम स्वामींच्या यशस्वी दिव्य मार्गदर्शनाखाली गोमंतकात संपन्न झाले
आहेत.
गोव्याचे समुद्र किनारे हे मौजमजा करण्यासाठी नसून योग प्रशिक्षणासाठी आहेत, याचे खरेखुरे ज्वलंत उदाहरण योग महोत्सवाच्या माध्यमातून स्वामींनी समस्त विश्वाला दाखवून दिले आणि हीच तर गोव्याची ओळख असून गोवा म्हणजे भोगभूमी नसून योगभूमी आहे असा उपदेशच केला. श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर योगशास्त्राचे डिप्लोमा इन योगशास्त्र यासारखे विश्वविद्यालय मान्यताप्राप्त अभ्यासक्रम सुरू आहेत. राष्ट्रीय पातळीवर आयोजित होणाऱ्या योग स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना कित्येक पारितोषिके व सुवर्ण पदकेही प्राप्त झाली. असे हे योगविद्येचा प्रचार-प्रसार करून ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
योगशास्त्रावर संबोधित करताना स्वामी उपदेश करत आहेत की शरीरमाद्यं खलु धर्म साधनम्। देवाची जर भक्ती करायची असेल, साधना करायची असेल तर शरीर तंदुरुस्त असले पाहिजे आणि माणसाला निरामय जीवन मिळावे यासाठी योग सर्वोपकारी आहेच, पण सर्वोत्कृष्ट आहे. कित्येक जण या योगविद्येकडे व्यायामाचा एक प्रकार म्हणून पाहतात. पण योग हे शास्त्र आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. शरीर एक साधन आहे. फक्त आसन करणे म्हणजे योग नसून त्यामध्ये अनुशासन असणे अत्यंत आवश्यक आहे. अथ योगानुशासनम्। योग म्हणजे अनुशासन. आपल्या जीवनामध्ये शिस्तबद्धता ठेवल्याने योग प्राप्ती होते. आजच्या घडीला मनाच्या शांतीसाठी योगाशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. अनुशासनामध्ये जो राहतो तो सन्मानित होतो. ज्या गोष्टी आपल्या ॠषिमुनींनी आम्हाला दिलेल्या आहेत त्या आपण मोठ्या श्रद्धेने स्वीकारल्या पाहिजेत. ज्या ॠषिमुनींनी हा योग आमच्यापर्यंत पोचवला त्यांच्याप्रती कृतज्ञ राहणे, आमचे कर्तव्य आहे. देश-विदेशातला असो, कुठल्याही धर्म, पंथ, जातीचा असो, बाल, तरुण, वृद्ध, स्त्री, पुरुष असो योग त्याला निरामय जीवन प्रदान करतो. योगमयं विश्वं कुरु। विश्वामध्ये असलेल्या सर्व लोकांना योगमय करुया. त्यामुळे ते आनंदमय जीवन जगू शकतील. असा उपदेश सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी करत आहेत.
शनिवार २१ जून रोजी सद्गुरू योग गुरुकुल तथा राष्ट्रीय आयुष मिशन - आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय - गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे राज्यात विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. भारत देशात प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ असावे या हेतूने भारत सरकार व राज्य सरकारकडून योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य होताना आपण पाहतो. पंतप्रधान मोदी यांनी देशात व गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही राज्यात योग दिनाचे मोठ्या प्रमाणात आयोजन व्हावे यासाठी मोठी चळवळ सुरू करून सर्वत्र योग दिन साजरा करण्यासाठी आवाहनही केले आहे. विविध योग क्षेत्रात कार्य करणार्या संस्थादेखील एकत्रित आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एक योगक्रांती घडविणार आहे. योग दिनानिमित्त सर्व शहरात, गावोगावी विविध मंदिर, संस्था, शाळा, महाविद्यालय, सभागृह, बसस्थानक, रेल्वेस्थानक, पोलीस स्थानक, विमानतळावर, सरकारी कार्यालयांतही कर्मचारी वर्ग, जनसमुदाय योगासने करताना पाहणार आहोत. यापूर्वी ही अनेक वर्षी तपोभूमी गुरुपीठातर्फे ५०० हून अधिक ठिकाणी योग दिन संपन्न करून एक इतिहास रचला होता. चला आज आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभागी होऊन क्रांतीकारक इतिहासाचे भागिदार होऊया.
व्रजेश गुरव
(श्री क्षेत्र तपोभूमी-गोवा)