राज्यात जुनागड आणि मेहसाणा जिल्ह्यातील अनुक्रमे विसावदर आणि कडी विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकीसाठी गुरुवार, १९ जून रोजी मतदान पार पडले. राज्याची सत्ता सातत्याने भाजपकडे असली तरी गेल्या १८ वर्षांपासून विसावदरमध्ये ‘कमळ’ फुललेले नाही. मागील २०२२ च्या निवडणुकीत येथून ‘आप’ने बाजी मारली; मात्र डिसेंबर २०२३ मध्ये येथील आमदाराने राजीनामा देऊन ‘कमळ’ हाती धरले. आता या पोटनिवडणुकीत तरी भाजपला ही जागा जिंकता येते का, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
विसावदरमध्ये भाजप, काँग्रेस आणि आप अशी तिरंगी लढत होत आहे. विसावदरचे ‘आप’चे तत्कालीन आमदार भूपेंद्र भयानी यांनी डिसेंबर २०२३ मध्ये पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देऊन सत्ताधारी भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. भाजपचे आमदार करसन सोलंकी यांच्या निधनानंतर अनुसूचित जाती (एससी) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या कडी मतदारसंघाची जागा ४ फेब्रुवारीपासून रिक्त आहे. १८२ जागांच्या विधानसभेत भाजपचे १६१, काँग्रेसचे १२ आणि ‘आप’चे ४ आमदार आहेत. एक जागा समाजवादी पक्ष आणि दोन जागा अपक्षांकडे आहेत.
'आप'ने यावेळी विसावदरमधून गोपाळ इटालिया यांना, तर कडी मतदारसंघातून जगदीश चावडा यांना रिंगणात उतरवले आहे. २०२२ च्या निवडणुकीत विसावदरमधून 'आप'चा, तर कडीमधून भाजपचा उमेदवार विजयी झाला होता. राज्यात अनेक दशकांपासून भाजपची सत्ता आहे; पण १८ वर्षांपासून विसावदरमध्ये भाजपला विजयाचा गुलाल उधळता आलेला नाही. यावेळी 'आप'चे माजी प्रदेशाध्यक्ष गोपाल एटालिया हे पक्षाचे उमेदवार आहेत. अरविंद केजरीवाल स्वत: त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. भाजपने किरीट पटेल यांना, तर काँग्रेसने नितीन रणपरिया यांना उमेदवारी दिली आहे.
कडी मतदारसंघातून भाजपने राजेंद्र चावडा, काँग्रेसने रमेश चावडा, तर 'आप'ने जगदीश चावडा यांना रिंगणात उतरवले आहे. रमेश चावडा २०१२ च्या निवडणुकीत विजयी झाले होते.
विसावदर मतदारसंघ गेल्या १८ वर्षांपासून भाजपला जिंकता आलेला नाही. हा मतदारसंघ एकेकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचा मतदारसंघ होता. यावेळी ही जागा भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनली आहे. दोन्ही मतदारसंघांत भाजप, काँग्रेस आणि आप या तिन्ही पक्षांनी विजयाचा दावा केला असला तरी सोमवार, २३ जून रोजी मतमोजणीनंतरच कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडली, हे समजणार आहे.
प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)