गोव्यात गावठी मासे खातात भाव; दरांत मोठी वाढ

मासेमारी बंदीमुळे बाजारात परराज्यातील मासे दाखल : नदीकिनारी माशांच्या खरेदीसाठी गर्दी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
19th June, 12:58 am
गोव्यात गावठी मासे खातात भाव; दरांत मोठी वाढ

पणजी : गोव्यात सध्या मासेमारीवर बंदी असल्याने त्याचबरोबर पावसामुळे गावठी माशांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून गोवेकरांना ताज्या माशांशिवाय जेवण जेवणे शक्य होत नाही. वाढत्या मागणीमुळे गावठी माशांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे महाग असूनही गोवेकर बाहेरच्या राज्यांतील माशांपेक्षा स्थानिक मासे खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
गोव्यात ३१ जुलैपर्यंत समुद्रातील मासेमारीवर बंदी आहे. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांतून मासे गोव्यात येत आहेत, जेणेकरून गोवेकरांची माशांची चव पूर्ण होऊ शकेल. परंतु हे मासे ताजे नसल्याने स्थानिक ते खरेदी करण्यास कचरतात. त्यामुळे, गोवेकरांचा ओढा मानसी, खारीजात पेजर, गरवलेले यांसारख्या गावठी माशांकडे आकर्षित होत आहेत. बाजारात मिळत असलेल्या माशांव्यतिरिक्त, बहुतेक गोवेकर हे मासे खरेदी करण्यासाठी थेट नदीकाठावर गर्दी करत आहेत. राज्याबाहेरील माशांची मागणी कमी झाल्यामुळे स्थानिक गावठी माशांच्या किमती मात्र खूप वाढल्या आहेत.
पणजी बाजारातही बाहेरून आयात केलेल्या माशांचे दर तुलनेने स्थिर आहेत. बाजारात सुंगटा (आकारानुसार) ४०० ते ५०० रुपये किलो, पापलेट १२०० रुपये किलो, तारले आणि बांगडे २०० रुपये, बारीक सुंगटा १०० रुपये (वाटा) या दराने विकले जात आहेत. पणजी बाजारात सध्या इस्वण, चोणक आणि कोकार या माशांचा तुटवडा जाणवत आहे.
गावठी माशांचे दर (रु.)
मोठी काळूंदरे : ५००
लहान काळूंदरे : ३००
तोपो : ५००
मोठी घोळशी : ५००
भानोशी : ५०० ते ८००
सौंदाळे : ५००
मुड्डोशी : ७००
बारीक सुंगटा : २००
करबट : ३००
ओढ्यातील मासे : ५०० 

हेही वाचा