लाभार्थ्यांपर्यंत रेशन पोहोचवण्यासाठी केंद्राची ई-केवायसी सक्ती
पणजी : रेशन कार्डचे ई-केवायसी पूर्ण करण्यामध्ये धारबांदोडा आणि डिचोली तालुके गोव्यात आघाडीवर ठरले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत (एनएफएसए) येणाऱ्या अंत्योदय अन्न योजना (एएवाय ) आणि प्राधान्य कुटुंब (पीएचएच) तसेच दारिद्र्यरेषेवरील रेशन कार्डधारकांच्या ई-केवायसीची सर्वाधिक संख्या दक्षिण जिल्ह्यातील धारबांदोडा तालुक्यात नोंदवली गेली आहे, तर उत्तर जिल्ह्यातील डिचोली तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने दिली.
खात्यातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लाभार्थ्यांपर्यंत रेशन योग्य प्रकारे पोहोचावे आणि त्याचा गैरवापर रोखता यावा, यासाठी केंद्र सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. एनएफएसए अंतर्गत येणाऱ्या एएवाय आणि पीएचएच रेशन कार्ड लाभार्थ्यांपैकी ७३.६१ टक्के आणि दारिद्र्यरेषेवरील रेशन कार्ड लाभार्थ्यांपैकी ५३.५८ टक्के प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
धारबांदोडा तालुका ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या पीएएच कार्डधारकांच्या यादीत अव्वल स्थानावर असून त्यांनी ८९.०५ टक्के ई-केवायसी पूर्ण केले आहे. ज्यामध्ये १२,६७० पैकी ११,४०१ लाभार्थी आहेत. तसेच धारबांदोडामध्ये, ८८.०८ टक्के एएवाय कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केले असून ६४६ पैकी ५७१ लाभार्थी आहेत. तसेच, या तालुक्यातील दारिद्र्यरेषेवरील कार्डधारकांचे ७९.९९ टक्के ई-केवायसी पूर्ण झाले असून ६,५७३ पैकी ५,३२६ लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे.
डिचोली, तिसवाडीचीही आघाडी
* डिचोली तालुक्यात पीएचएच कार्डधारकांनी ८०.२ टक्के ई-केवायसी पूर्ण केले असून ४२,४२३ पैकी ३४,२६२ लाभार्थी आहेत.
* तालुक्यातील दारिद्र्यरेषेवरील कार्डधारकांनी ६०.०४ टक्के ई-केवायसी पूर्ण केले असून ३३,०५० पैकी १९,९५० लाभार्थी आहेत.
* तिसवाडी तालुक्यातील एएवाय कार्डधारक ई-केवायसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी ८४.६७ टक्के ई-केवायसी पूर्ण केले असून १,४८९ पैकी १,२२२ लाभार्थी आहेत.