मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही स्थिती कायम
पणजी : गोव्यातील टॅक्सी चालकांनी अॅप अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे रद्द करण्याच्या मागणीसाठी आपला लढा सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी ही मार्गदर्शक तत्त्वे स्थगित करण्याचे आश्वासन दिले असले तरी, ते पूर्ण झालेले नसल्याने टॅक्सी चालक संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही एकत्रितपणे मार्गदर्शक तत्त्वेरद्द करण्याची मागणी करणारे निवेदन सादर करू, असे कामत यांनी म्हटले आहे.
बुधवारी याचिका सादर करण्यासाठी येणार असल्याची घोषणा टॅक्सी चालकांनी केल्यानंतर राज्य सरकारने जुन्ता हाऊस परिसरात कलम १६३ नुसार कर्फ्यू लागू केला. यावेळी इमारतीबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावरून सरकार टॅक्सी चालकांना घाबरते हे सिद्ध होते, असा आरोप कामत यांनी केला. आमचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत शांततेत असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जुन्ता हाऊसबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
राज्य सरकारने अॅप अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वांचा प्रस्तावित मसुदा सार्वजनिक सूचनेसाठी खुला केला आहे. मात्र, टॅक्सी चालकांनी या मसुद्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. आणखी हजारो हरकती सादर करण्याची आमची योजना आहे. दरम्यान, टॅक्सी चालक येथे आंदोलन करणार, असा संशय आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी कर्फ्यू जारी केला, ज्यामुळे जुन्ता हाऊसबाहेर शेकडो पोलीस आणि वाहने तैनात करण्यात आली होती.
अॅप अॅग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे स्थानिक टॅक्सी चालकांच्या हिताची नाहीत. आम्ही स्थानिक आमदारांना याबाबतची खात्री पटवून दिलेली आहे. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांविरुद्ध आमचे आंदोलन सुरूच राहील. - चेतन कामत, अध्यक्ष, टॅक्सी चालक संघटना