गावडेंनंतर इतर काही मंत्र्यांचाही पत्ता होणार कट!

Story: अंतरंग - गोवा |
19th June, 12:43 am
गावडेंनंतर इतर काही मंत्र्यांचाही पत्ता होणार कट!

मु ख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडील आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर काहीच दिवसांपूर्वी टीका केलेल्या गोविंद गावडे यांना अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपने मंत्रिमंडळातून वगळले आहे. त्यांच्याजागी मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण, पुढील आठ दिवसांत इतरही अनेक घडामोडी घडतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केल्यामुळे विद्यमान मं​त्रिमंडळातील अजून काही मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

काही दिवसांपूर्वी फोंड्यात झालेल्या ‘आदिवासी प्रेरणा दिन’ कार्यक्रमात बोलताना गोविंद गावडे यांनी थेट मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे असलेल्या आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीकास्र सोडले. पणजीतील श्रमशक्ती भवनच्या खाली कंत्राटदारांकडून ‘घेवाण देवाण’ होऊन फायली वरपर्यंत पोहोचवल्या जातात, असे म्हणत त्यांनी या खात्यात भ्रष्टाचार होत असल्याचे अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केले. गावडे यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांना, तर विरोधी आमदारांनी सरकारला लक्ष्य केले. हा वाद पुढील अनेक दिवस कायम राहिला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी पक्षशिस्तीचा भंग केल्याच्या कारणास्तव गोविंद गावडे यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे म्हटले होते. त्यानंतर या विषयावरून पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याची कोणतीही वाच्यता न करता मुख्यमंत्री आणि भाजपने समन्वय साधत गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवले आहे.

राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून मं​त्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या चर्चा सुरू आहेत. मध्यंतरी लोकसभा निवडणुकीआधी दक्षिण गोव्यातील मतदारांचा विचार करून भाजपने नीलेश काब्राल यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्याजागी आलेक्स सिक्वेरा यांची वर्णी लावलेली होती. त्यानंतर मात्र फेरबदल झाला नाही. आता गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याने आणखी काही मंत्र्यांना वगळून नव्या आमदारांना संधी देण्याचा विचार भाजपने चालवला आहे. त्यामुळेच गावडेंना हटवल्यानंतर तत्काळ त्यांच्या जागी नव्या मंत्र्याला शपथ देण्यास उशीर केला जात असल्याचेही दिसून येत आहे.

आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर केलेल्या टीकेनंतर गोविंद गावडेंचे मंत्रिपद जाणार, याची खात्री निर्माण झाल्याने ‘उटा’ संघटना त्यांच्या बचावासाठी मैदानात उतरली होती. गावडेंना मंत्रिमंडळातून वगळू नये, यासाठी या संघटनेने विविध मार्गांनी सरकारवर दबावही आणला होता. तरीही मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजपने पुढील काळातील राजकीय आ​राखडे बांधत गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळले आहे. आदिवासी समाजातून याचे पडसाद नेमक्या कशा पद्धतीने उमटणार, हे पुढील काहीच दिवसांत दिसून येणार आहे.


- सिद्धार्थ कांबळे