कामरखाजन म्हापसा ‘हिट अॅण्ड रन’ अपघात प्रकरण
म्हापसा : कामरखाजन म्हापसा येथील ‘हिट अॅण्ड रन’ अपघात प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या दुचाकी मालक शब्बीर कासिम शेख (४८, मरड म्हापसा) व दुचाकीवर मागे बसलेला रिहान शकील शेख (१८, मरड म्हापसा) या काका पुतण्याची अतिरिक्त सत्र न्यायालयाने सशर्त जामिनावर सुटका केली. या अपघातात आकांक्षा बोरा (रा. कामरखाजन) ही बारा वर्षीय मुलगी ठार झाली होती.
मेरशी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश क्षमा जोशी यांनी दोन्ही संशयितांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. संशयित शब्बीर कासिम शेख याची १५ हजार रूपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, १५ दिवस पोलीस स्थानकात सकाळच्यावेळी हजेरी लावणे, साक्षी पुराव्यात हस्तक्षेप न करणे, न्यायालय व चौकशी अधिकार्यांना आवश्यक असल्यावेळी हजर राहणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्य किंवा देशाबाहेर न जाणे व इतर अटी लागू केल्या आहेत.
तर, संशयित रिहान शेख याची १० हजार रुपये हमी रक्कम व तितक्याच रकमेचा हमीदार, चौकशी अधिकारी व न्यायालयात आवश्यकतेवेळी हजर राहणे, आरोपपत्र दाखल होईपर्यंत तपासकामात सहकार्य करणे, न्यायालयाच्या परवानगीशिवाय राज्य किंवा देशाबाहेर न जाणे, अशा अटी घातल्या आहेत.
दरम्यान, हा अपघात दि. २७ मे रोजी रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास कामरखाजन येथे राष्ट्रीय महामार्गावर घडला होता. मुलगी आपल्या तीन मैत्रिणींसोबत महामार्ग ओलांडत होती. यावेळी भरधाव बुलेटची तिला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता. अपघात घडताच मुलीच्या मैत्रिणींनी आरडाओरडा करीत धाव घेतली. मात्र, सुदैवाने त्यावेळी महामार्गावर वाहने धावत नसल्याने त्या दुर्घटनेतून बचावल्या होत्या.
याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भा.न्या.सं.चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब), १०५, ४५ व ४६ आणि मोटार वाहन कायदा कलम १३४ (अ) व १३४ (ब) अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती.
रस्ता ओलांडत असताना झाला होता अपघात
अपघात दि. २७ मे रोजी कामरखाजन येथे राष्ट्रीय महामार्गावर घडला होता. संबंधित मुलगी आपल्या तीन मैत्रिणींसोबत महामार्ग ओलांडत होती. यावेळी भरधाव बुलेटची तिला जोरदार धडक बसली होती. या अपघातात जखमी होऊन तिचा मृत्यू झाला होता.