राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पेडणेमध्ये सर्वाधिक विक्रमी पाऊस

हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा : आज, उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th June, 12:13 am
राज्यात मान्सूनचा जोर वाढला; पेडणेमध्ये सर्वाधिक विक्रमी पाऊस

पणजी : गोव्यात मान्सूनने आता जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारी (१४ जून) राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, सकाळी ८.३० वाजेपर्यंत राज्यात सरासरी २ इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः पेडणे तालुक्यात सर्वाधिक ५.७४ इंच पावसाची नोंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. काही ठिकाणी पडझडीच्या आणि नुकसानीच्या घटनाही समोर आल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) गोव्यासाठी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार १५ आणि १६ जून या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, १७ ते २० जून दरम्यान राज्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, या चार दिवसांसाठी यलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
राज्यातील तापमानाची स्थिती
शनिवारी पणजीमध्ये कमाल २९ अंश सेल्सिअस, तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान २७.६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.८ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

यंदा संथ पाऊस
राज्यात १ ते १४ जून दरम्यान सरासरी ११.५० इंच पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी याच कालावधीत (१ ते १४ जून) सरासरी १८.३२ इंच पावसाची नोंद झाली होती, त्यामुळे यावर्षी पावसाचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत थोडे कमी आहे.
प्रमुख शहरांमधील पावसाची आकडेवारी
शहर पाऊस (इंच मध्ये)
म्हापसा : ३.५१
पणजी : २.६६
साखळी : २.५३
धारबांदोडा : २.३६
सांगे : १.६५
फोंडा : १.६०
दाबोळी : १.४८
मुरगाव : १.२७
जुने गोवा : १.२२
केपे : १.१८
काणकोण : ०.९५
वाळपई : ०.९१ इंच