चार वाहनांचे नुकसान : सात लाखांची हानी
पेडणे : हरमल समुद्रकिनारी रेंट अ कॅब थार जीपने चिरडल्याने हनुमंत कदम (७१, मुंबई) हे पादचारी पर्यटक ठार झाले. या ड्रंक अँड ड्राईव्ह अपघातात पार्क केलेल्या चार गाड्यांचे नुकसान झाले. मांद्रे पोलिसांकडून थार चालकाला अटक करण्यात आली आहे.
शनिवार, दि. १४ रोजी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास रेंट कार थार जीप (जी ए ०३ ए एच ५२६४) चा चालक अरविंद सिंग रावत (दिल्ली) नशेत गाडी चालवित होता.
समुद्रकिनाऱ्यावरून जाताना तिथे पार्क केलेल्या दोन स्विफ्ट कार जी. ए. ०८ व्ही ७१३०, जी. ए. ०८ व्ही ३४४५ व अॅक्टिव्हा स्कूटर जी. ए. ०३ एसी ९१७८ व पार्क करून ठेवलेल्या स्थानिक वस्त यांच्या मालकीच्या जी. ए. ११ टी २८५७ या महिंद्रा एक्सयूव्हि जीपला धडक देऊन थार जीप वीज खांबावर धडक देऊन थांबली. सदर पर्यटक जीपगाडी घेऊन बीचवर आला होता. त्याच्या गाडीत बियरच्या बाटल्या होत्या. अपघात झाल्यानंतर त्याला नशेमुळे उभे राहताही येत नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, हनुमंत कदम हे आपल्या आठ मित्रांसह फिरायला आले होते. ते चालत मुख्य रस्त्यावर येत असताना त्यांना मागाहून गाडीने धडक दिली व त्यांच्या अंगावरून जीप गेली. पुढे जीपने स्कूटर व विनायक वस्त यांच्या बाजूला पार्क करून ठेवलेल्या महिंद्रा एक्सयूव्हिला जोरदार धडक दिली. त्यात वस्त यांच्या गाडीचे बोनेट, पुढील बाजू निकामी झाली. त्यांचे अंदाजे ७० हजारांचे नुकसान झाले. अन्य चार वाहनांचे मिळून पाच ते सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
पोलिसांनी थार जीपमधील सर्वांना ताब्यात घेतले तसेच मृतदेह चिकित्सेसाठी बांबोळी येथे रुग्णालयात हलविण्यात आला.
यावेळी घटनास्थळी पोलीस अधीक्षक सलीम शेख, मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक व अन्य उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
जीप चालकावर कारवाईची मागणी
दरम्यान, अपघातात बळी पडलेल्या मुंबईतील त्याच्या मित्रांनी हा प्रसंग डोळ्यासमोर पाहिला व त्यांना रडू कोसळले. कदम हे कामातून निवृत्त झाले होते.
त्यांचे मित्र चांदेल येथे आले होते व तिथून आठ जण बसने ते हरमल किनाऱ्यावर आले होते. दारूच्या नशेत थार जीप चालकाने अपघात केल्याने त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्या गटाने व माजी सरपंच इनासियो डिसोझा यांनी केली आहे.