विदेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या ठेवणार्‍या सहा घर मालकांवर गुन्हा दाखल

पाच महिन्यांत ६ गुन्हे : बेकायदा वास्तव्य; २३ विदेशी नागरिकांना अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th June, 11:38 pm
विदेशी नागरिकांना बेकायदेशीररीत्या ठेवणार्‍या सहा घर मालकांवर गुन्हा दाखल

म्हापसा : विदेशी नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवताना पोलिसांत सी फार्म तथा पडताळणी अर्ज सादर न केल्याप्रकरणी राज्यातील सहा घर मालकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. गेल्या पाच महिन्यांत हे ६ गुन्हे हणजूण, मांद्रे, म्हापसा, वेर्णा व कोलवा पोलिसांत दाखल केले आहेत. तसेच पोलिसांनी राज्यात बेकायदा वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली २३ विदेशी नागरिकांना अटक केली आहे.

हणजूण पोलिसांनी परम व्हर्ती (रा. शिवोली बार्देश), समित अनंत धारगळकर (रा. ओशेल शिवोली, बार्देश), मांद्रे पोलिसांनी लिओनार्ड ग्रासिएस डिसोझा (रा. हरमल पेडणे), म्हापसा पोलिसांनी मारिओ फर्नांडिस (रा. पर्रा बार्देश), वेर्णा पोलिसांनी लिझेट फर्नांडिस (रा. कासावली, मुरगाव), कोलवा पोलिसांनी कुसूम शर्मा (रा. माजोर्डा सासष्टी व मूळ जयपूर) यांच्याविरुद्ध हे गुन्हे नोंदवलेले आहेत.

गोवा पोलिसांकडून गेल्या काही महिन्यांपासून बेकायदा गोष्टींचा शोध किंवा त्या प्रतिबंधित करण्यासाठी आणि अंतर्गत सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी राज्यभर नियमित तपासणी मोहीम व कॉम्बिंग ऑपरेशन राबवली जात आहेत.

या मोहिमेंअंतर्गत भाड्याने घेतलेल्या जागेत किंवा गेस्ट हाऊसमध्ये राहणार्‍या परदेशी नागरिकांनी विदेशी नागरिक कायद्यांअंतर्गत अनिवार्य नोंदणी नियमांचे पालन केले आहे की नाही, याची तपासणी केली जाते. त्यानुसार सक्षम अधिकार्‍यांना अनिवार्य असलेले सी फॉर्म सादर न करता विदेशी नागरिकांना भाडेकरू म्हणून ठेवणार्‍या वरील सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, वरील कालावधीत राज्यात २३ विदेशी नागरिक हे बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असल्याचे आढळून आले. त्यापैकी २१ जण उत्तर गोव्यात तर दोघे जण दक्षिण गोव्यात सापडले. कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई सुरू आहे.

१९४६ च्या विदेशी नागरिक कायदा आणि संबंधित नियमांनुसार सी फॉर्म भरणे आवश्यक आहे. ज्यामध्ये घर मालक, गेस्ट हाऊस चालक किंवा निवास पुरवठादारांनी विदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती त्यांच्या आगमनानंतर २४ तासांत देणे बंधनकारक आहे. राज्यात येणार्‍या परदेशी नागरिकांची सुरक्षितता, त्यांना शोधण्यायोग्य सुनिश्चित करण्यासाठी याची गरज आहे.

पोलिसांचे जनतेला आवाहन

विदेशी नागरिकांना आपल्याकडे भाडेकरू म्हणून ठेवणार्‍यांनी सी फॉर्मसंबंधित कायदेशीर आवश्यकतेचे कडकरित्या पालन करायला हवे. याचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. शिवाय जनतेला अशा कोणत्याही उल्लंघनाची तक्रार जवळील पोलीस स्थानकात किंवा गोवा पोलिसांच्या अधिकृत चॅनेलद्वारे करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

हेही वाचा