गतवर्षीप्रमाणे यंदाही वाहन चालकांसमोर संकट
पावसामुळे पणजीतील रस्त्यावर पडलेले खड्डे. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : मान्सूनचा पाऊस सुरू होण्याआधी सार्वजनिक बांधकाम खात्याने (पीडब्ल्यूडी) राजधानी पणजीतील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले होते. मान्सूनपूर्व काळात आणि त्यानंतर आता सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे त्याच रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले आहेत. खड्डे चुकवताना वाहन चालकांची तारांबळ उडत असून, पाऊस संपेपर्यंत खड्ड्यांचा त्रास त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत पणजीत सुरू असलेली अनेक ठिकाणची कामे पूर्ण झाल्यानंतर ‘पीडब्ल्यूडी’ने पणजीतील काही ठिकाणच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण, तसेच काही रस्त्यांवर पेव्हर्स बसवण्याचे काम सुरू केले; पण मे महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली. ‘पीडब्ल्यूडी’ने ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजवले होते, ते खड्डे पावसामुळे पुन्हा उघडे झाले असून, पावसाचे पाणी त्यात साचत असल्याने वाहन चालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
पाऊस सुरू होण्याआधी पणजीतील सर्वच रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाईल. यंदाच्या पावसाळ्यात स्थानिक जनता आणि वाहन चालकांना खड्ड्यांचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मॉन्सेरात यांनी दिली होती; परंतु ‘पीडब्ल्यूडी’ने यंदाही रस्त्यांच्या कामात दर्जा न ठेवल्यामुळेच रस्त्यांची स्थिती गतवर्षीप्रमाणे होण्यास सुरुवात झाली आहे. स्थानिक आणि राज्यभरातून पणजीत येणाऱ्या वाहन चालकांना संपूर्ण पावसाळा या खड्ड्यांचा सामना करावा लागणार असल्याची खंत स्थानिक जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे.
काँक्रिटीकरणानंतरही रस्ते खोदाई सुरूच
रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर काँक्रिटीकरण केलेला रस्ता कुणालाही फोडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी सांगितले होते. तरीही मलनिस्सारण तसेच अंतर्गत वाहिन्यांसाठी अजूनही अनेक भागांतील रस्त्यांची खोदाई सुरूच आहे. ‘पीडब्ल्यूडी’कडून याचे खापर जिल्हाधिकाऱ्यांवर फोडले जात आहे.