होडार, शेळवण येथील प्रस्तावित जेटी, उड्डाण पुलाला विरोध

प्रसंगी एनजीटीकडे धाव घेण्याचा ग्रामस्थांचा इशारा


14th June, 11:35 pm
होडार, शेळवण येथील प्रस्तावित जेटी, उड्डाण पुलाला विरोध

ग्रामस्थांसमोर आपली भूमिका मांडताना अामदार नीलेश काब्राल.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
केपे : होडार व शेळवण येथील प्रस्तावित जेटी व रेल्वे उड्डाणपूल यांना ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे. कोणत्याही परिस्थितीत जेटी होऊ देणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. दोन्ही ठिकाणी जुवारी नदीच्या काठावर चार जेटी बांधण्यासाठी सीआरझेडने ‘ना हरकत’ दाखला दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याविरोधात राष्ट्रीय हरित लवदाकडे जाण्याची तयारी ग्रामस्थांनी केली आहे. याविषयी ग्रामस्थांनी स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका स्पष्ट केली.
शेळवण व होडार येथील प्रस्तावित जेटी प्रकल्प स्थानिकांच्या कामाचा नसून या जेटीमुळे शेती नष्ट होणार आहे, अशी भीती मनोज नाईक यांनी व्यक्त केली. सदर जेटीवर लोडिंग व अनलोडिंगसाठी वेगळ्या जेटी बांधण्यात येणार असल्याने लोकांमध्ये धास्ती आहे. सदर जेटीविरोधात यापूर्वीही ग्रामस्थांनी आवाज उठवला होता, असे सरपंच किसतोड फर्नांडिस यांनी सांगितले. जेटी व उड्डाण पुलामुळे नुकसान होणार असल्याने आम्ही याविरोधात राष्ट्रीय हरित लवदापुढे जाण्याची तयारी केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
लोकांना नको असलेल्या प्रकल्पांना पाठिंबा नाही : काब्राल
सुुमारे ५० हून अधिक ग्रामस्थांनी आपल्यापुढे येऊन जेटी व रेल्वे उड्डाण पुलाला विरोध दर्शवला आहे. आपण यापूर्वीही सांगितले होते की, लोकांना जे नको आहे, त्याला मी पाठिंबा देणार नाही. आपण ग्रामस्थांसोबत आहोत. रेल्वे उड्डाण पूल इतरत्र बांधावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. याठिकाणी प्रस्तावित नवीन जेटींना आपला विरोध आहे, असे स्थानिक आमदार नीलेश काब्राल यांनी सांगितले.      

हेही वाचा