पावसामुळे आमोणे, खोतीगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान

सुपारीसह प्लास्टिक पाईप गेली वाहून


14th June, 11:34 pm
पावसामुळे आमोणे, खोतीगावच्या शेतकऱ्यांचे नुकसान

दाबेल येथील प्रसाद वेळीप यांच्या पाणी फिल्टरचे व इतर सामानाचे झालेले नुकसान.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : जोरदार पडलेल्या पावसामुळे आमोणे दाबेल येथील प्रगतीशील शेतकरी प्रसाद वेळीप यांचे मोठे नुकसान झाले. दाबेल येथील शेताच्या शेजारी असलेल्या घरात साठवून ठेवलेली सुपारी पावसाचे पाणी घरात शिरल्याने वाहून गेल्याची माहिती वेळीप यांनी दिली.
प्रसाद वेळीप यांच्या शेताशेजारीच नदी असून पावसाच्या पाण्याने नदी ओसंडून वाहू लागल्याने व रात्रीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने सुपारी वाहून जाण्याबरोबरच शेतातील प्लास्टिक पाईप्स, ड्रिप केलेली पाईपलाईन, पाणी फिल्टर मशिनचेही नुकसान झाले. प्लास्टिक पाईपलाईन वाहून गेल्याचेही वेळीप यांनी सांगितले. यामुळे वेळीप यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. नदीतील गाळ उपसा न केल्याने आपल्याला फटका बसल्याचे ते म्हणाले.
खोतीगाव येथे नदीच्या बाजूला असलेले तारांचे कुंपण वाहून गेले असल्याची माहिती खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर यांनी दिली. सुकाशेत येथील विष्णू गावकर यांची ऊस लागवड, तर जगदीश वेळीप यांचे तारांचे कुंपण वाहून गेले.

हेही वाचा