इंफाळ : मणिपूरमध्ये सुरक्षाबलांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. मणिपूर पोलीस, सीएपीएफ, सैन्याच्या आसाम रायफल्स यांच्या संयुक्त ऑपरेशनमध्ये १३ ते १४ जून दरम्यान रात्री पाच जिल्ह्यांतील खोऱ्यातील भागात शोधमोहीम राबवण्यात आली.
या मोहिमेदरम्यान एकूण ३२८ बंदुका व रायफल्स सापडल्या. यात १५१ एसएलआर रायफल्स, ६५ आयएनएसएएस रायफल्स, ७३ विविध प्रकारच्या रायफल्स, ५ कार्बाईन गन्स, २ एमपी-५ गन्स आणि अन्य स्फोटके व युद्धसामग्रीचा समावेश आहे.
एजीडीपी लहरी दोरजी ल्हाटू यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईमुळे एक मोठी संभाव्य हिंसक कारवाई टळली. ही संयुक्त मोहीम मणिपूरमध्ये शांती व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मोठी यशस्वी ठरली आहे. सुरक्षाबलांच्या गुप्त माहितीवरून केलेल्या या ऑपरेशनमुळे मोठा कट उधळून लावण्यात यश आले असून, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अशा मोहिमा सुरूच राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.