चिखल, दुर्गंधीमुळे विक्रेते, ग्राहक त्रस्त; त्वरित उपाययोजनेची मागणी
मडगाव : एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटमध्ये दिवसाला येणारी शेकडो वाहने, त्यात सध्या सुरू असलेला मुसळधार पाऊस या परिस्थितीमुळे सध्या एसजीपीडीएच्या मासळी मार्केटमध्ये चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. विक्रेत्यांसह ग्राहकांनाही या दुर्गंधीमय भागातून वाट काढण्याची वेळ आली असून एसजीपीडीएने यावर त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी मासळी विक्रेत्यांनी केली आहे.
घाऊक मार्केटमध्ये सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. एसजीपीडीएकडून मार्केटमध्ये येणार्या गाड्यांकडून तासानिहाय प्रवेश कर आकारला जातो, मात्र मार्केटच्या डागडुजीकडे व स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गाड्यांच्या येण्या-जाण्यामुळे या भागात खड्डे पडले असून त्यात मासळीचे पाणी व पावसाचे पाणी एकत्र साचले आहे. त्यामुळे एसजीपीडीएने पाण्याचा निचरा करून तातडीने खड्डे बुजवावेत, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
केवळ प्रवेश कर घेऊन महसूल वाढवण्यात मश्गूल असणाऱ्या एसजीपीडीएने सुविधा देण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. पावसाच्या दिवसात दुर्गंधीमय पाण्यातूनच वाट काढण्याची वेळ ग्राहकांसह मासळी विक्रेत्यांवर आली आहे. एसजीपीडीएच्या मार्केटमधील नव्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी काही सुविधा उभारण्याची कामे बाकी आहेत. दरम्यान या अस्वच्छ वातावरणाची दखल घेत एसजीपीडीएने उपाययोजना करावी आणि लवकरात लवकर नव्या इमारतीत मासळी विक्री सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली आहे.