दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, तत्काळ दुरुस्ती हाती
मडगाव : सांडपाणी वाहिन्यांसाठी रावणफोंड सर्कल नजीक खोदकाम करत भूमिगत टाक्यांची उभारणी करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी या ठिकाणाहून दुचाकी जात असताना अचानक रस्ता खचला व दुचाकी गतिरोधकाला जाऊन आदळली. सांडपाणी वाहिनीची कामगारांना माहिती मिळताच रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे.
मडगाव परिसरात सांडपाणी वाहिन्यांसाठी रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी दुचाकीस्वार लहान मुलासह महिलेला घेऊन मडगावच्या दिशेने जाण्यासाठी सर्कलकडून वळला असता अचानक रस्त्यावरील माती खचली व खड्डा पडला. यामुळे दुचाकी चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी गतिरोधकाला जाऊन आदळली. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी गाडीचे नुकसान झाले.
याप्रकारानंतर स्थानिकांनी बॅरिकेटस लावत रस्ता बंद केला. अपघाताची माहिती मिळताच सांडपाणी वाहिन्यांचे कामगार घटनास्थळी आले व त्यांनी रस्त्याची डागडुजी सुरू केली आहे. सध्या मुसळधार पाऊस पडत असून सांडपाणी वाहिन्यांसाठी खोदकाम करून रस्ते बुजवलेल्या भागात पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
तीन महिने उलटले तरीही सांडपाणी वाहिन्या बंदच
रावणफोंड सर्कलनजीक मडगाव रेल्वेस्थानकाकडे जाणार्या रस्त्यावर सांडपाणी वाहिन्यांचे पाणी साठवणूक करण्यासाठी भूमिगत टाकी उभारणी उभारण्यात आली आहे. या टाक्यातील पाणी पंपिंग करुन शिरवडे येथील सांडपाणी प्रकल्पात नेण्यात येणार आहे. हे काम करुन आता तीन महिने उलटले असले तरीही अजूनही सांडपाणी वाहिन्या कार्यरत करण्यात आलेल्या नाहीत.