मिनीबसच्या धडकेतील मृताच्या कुटुंबाला १८.५४ लाखांची नुकसान भरपाई

म्हापसा मोटार अपघात दावा लवादाचा आदेश : गोकुळवाडी-साखळी येथे घडला होता अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th June, 12:37 am
मिनीबसच्या धडकेतील मृताच्या कुटुंबाला १८.५४ लाखांची नुकसान भरपाई

म्हापसा : गोकुळवाडी-साखळी येथे प्रवासी मिनी बसच्या धडकेत निधन झालेल्या दुचाकीस्वार दत्तात्रय रामकृष्ण प्रभू लवंदे (६३, रा. हाऊसिंग बोर्ड हरवळे साखळी) यांच्या पत्नी व मुलीला नो फॉल्ट दायित्व रक्कमेसह १८.५४ लाख रूपये भरपाई रक्कम देण्याचा आदेश म्हापसा मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (लवाद) विमा कंपनीला दिला आहे.

हा भरपाई दावा मृत दत्तात्रय यांच्या पत्नी सुनिता व मुलगी देविका लवंदे यांनी लवादाकडे दाखल केला होता. या खटल्यात बस चालक मयुर विनायक नाईक (तिस्क उसगाव), बस मालक प्रितेश प्रेमानंद नाईक शिरोडकर (शिरोडा फोंडा) व नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. (फोंडा व डिचोली शाखा) यांना प्रतिवादी बनवण्यात आले होते.

अपघात दि. ६ सप्टेंबर २०१५ रोजी सायंकाळी ५.३५ वा. सुमारास गोकुळवाडी साखळी येथे घडला होता. जीए ०१ डब्ल्यू ४९७७ क्रमांकाच्या मिनी बसने ठोकरल्याने जीए ०४ के ३४२३ क्रमांकाचा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला होता. त्याच दिवशी गोमेकॉत उपचारादरम्यान त्याचे निधन झाले होते. ते साखळीतील एका बँकेत पिग्मी एजंट म्हणून नोकरी करत होते.

मृत्यूसमयी ते ६३ वर्षांचे होते. पिग्मी गोळा करून ते मासिक १८ ते २० हजार रूपये कमाई करीत होते. पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे आमचे १५ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा दावा सुनिता लवंदे यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये न्यायप्राधिकरणाकडे केला होता.

दरम्यान, खटल्याच्या सुनावणीवेळी प्रतिवादी ३ म्हणजेच नॅशनल इन्शूरन्स कंपनी लिमिटेडने प्रतिवादी १ असलेले बस चालक मयुर नाईक यांच्याकडे अपघातावेळी वैध वाहन चालक परवाना नसल्याचा दावा केला. परंतु प्रतिवादी बस चालकाने आपल्याकडे २००९ रोजी जारी केलेल्या वैध वाहन चालक परवाना होता व तो आपण सादर केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानुसार प्रतिवादी विमा कंपनीने प्रतिवादी बस चालकाकडे अपघातावेळी वैध वाहन चालक परवाना नसल्याचा दावा अपयशी ठरतो. तसेच प्रतिवादी विमा कंपनीकडे बस चालकाकडे हा परवाना नसल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाय वैध वाहन चालक परवाना नसतानाही विमा कंपनी भरपाई देण्यापासून मुक्त होणार नाही, असे निरीक्षणही लवादाने नोंदवले. त्यानुसार ऑगस्ट २०१९ पासून ६ टक्के वार्षिक व्याज आणि ५० हजार नो फॉस्ट दायित्व रक्कमेसह १८ लाख ५४ हजार ८०० रूपये रक्कम नुकसान भरपाई दाव्याच्या स्वरूपात दावेदारांना द्यावी, असा आदेश लवादाच्या पीठासीन अधिकारी शर्मिला पाटील यांनी जारी केला.

याचिकादारातर्फे अॅड. आर. पणशेकर तर प्रतिवादी बस चालक व मालकातर्फे अॅड. पार्सेकर आणि प्रतिवादी विमा कंपनीतर्फे एम. साळकर यांनी लवादाकडे युक्तीवाद केला.

मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे निर्देश

प्रतिवादी वीमा कंपनीने सदर रक्कम व्याजासह मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या म्हापसा स्टेट बँकेच्या चालू बँक खात्यात जमा करावी व न्यायाधिकारण तसेच दावेदाराला याची माहिती द्यावी, असे निर्देशही या निवाड्यात लवादाने दिले आहेत.

अपघातावेळी दत्तात्रय लवंदे यांचे वय ६३ वर्षांचे होते, त्यामुळे ते वयाच्या सत्तरी पर्यंत अजून ७ वर्षे रोजगार करू शकले असते. त्यामुळे या सात वर्षांत ते १३.४४ लाख रूपये कमवणार होते, असे न्यायाधिकारणाने निरीक्षण नोंदवले. 

हेही वाचा